दौंड, ता. ३० : दौंड तालुक्यातील बनावट मद्यनिर्मितीच्या फिरत्या कारखान्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन जणांना अटक केली आहे. विभागाने छापा टाकून कारखान्यातील यंत्रसामग्री, तयार मद्य आदींचा एकूण ८५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दौंड येथील निरीक्षक विजय रोकडे यांनी याबाबत माहिती दिली.
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी, गार व सोनवडी येथे मंगळवारी (ता. २७) छापे टाकून ही कारवाई करण्यात आली होती. पांढरेवाडी गावातील विजय झगडे याच्या ताब्यातील बनावट विदेशी मद्याचे १४१ बॅाक्स, एक ट्रॅक्टर व एक कार जप्त करण्यात आली. सोनवडी गावच्या हद्दीत सुनील नगराळे याच्या ताब्यातून स्वयंचलित यंत्रसामग्री, ३५०० लिटर मद्यार्क, बनावट विदेशी मद्याचे २ बॉक्स, साडेनऊ हजार रिकाम्या बाटल्या, यंत्रसामग्री, १ आयशर कंपनीचा टेम्पो, मोबाइल संच, आदी जप्त करण्यात आले.
गार हद्दीत सोमनाथ नांदखिले याने एका वीटभट्टीजवळ जमिनीत पुरून ठेवलेले बनावट देशी मद्याचे ४० बॅाक्स जप्त करण्यात आले. त्याचबरोबर बावीस हजार बनावट बाटलीचे बूच, साठ हजार बनावट लेबल, पंधरा हजार रिकाम्या बाटल्या, १ मोबाइल संच, जप्त करण्यात आला. कारवाईत एकूण बनावट मद्याच्या भरलेल्या १२ हजार ६४२ बाटल्या, २४ हजार ५०० रिकाम्या बाटल्या आणि साडेतीन हजार लिटर मद्यार्क जप्त करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी विजय जालिंदर झगडे (रा. पांढरेवाडी, ता. दौंड), सुनील प्रताप नगराळे (रा. धुळे) व सोमनाथ सुभाष नांदखिले (रा. गार, ता. दौंड) यांना अटक केली आहे. बनावट मद्यनिर्मिती प्रकरणी या तिघांवर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तिघांना कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक मयूर गाडे, एस. आर. गायकवाड, प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे यांच्यासह अंमलदार संकेत वाजे, सौरभ देवकर, सोपान टोम्पे, दत्तात्रय साळुंके, केशव वामने यांनी कारवाईत भाग घेतला.
फिरता मद्य कारखाना
दौंड तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून बनावट मद्यनिर्मिती केली जात होती. बनावट मद्यनिर्मिती करणारी टोळी स्वयंचलित यंत्रसामग्री ठराविक कालावधी नंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून बनावट मद्य तयार करत होती. एका ठिकाणी बनावट मद्यनिर्मिती करून त्याची ट्रॅक्टरमधून अन्य ठिकाणी वाहतूक करून तेथे बाटल्यांमध्ये मद्य भरले जात होते. त्यानंतर अन्य भागात बाटल्या सीलबंद करून खोक्यांमध्ये भरून वितरित केले जात होते. दौंड तालुक्यातील अनेकांचा या टोळीशी थेट संबंध असून ही टोळी बाजारातील मद्यासारखे हुबेहुब लेबल लावून या बनावट मद्याची महामार्ग व गावागावातील काही हॅाटेल, ढाबे आणि खासगी पुरवठादार यांना विक्री करत होते.