Jayant Patil NCP Merger: शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती, मागच्या सहा महिन्यात झालेल्या बैठकीत अजित दादांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती, शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. बारामतीला जी सर्व नेत्यांची बैठक झाली त्यासाठी आधी आम्ही विमानाने जाणार होतो, पण बारामतीच्या धावपट्टीवर विमान उतरेल असे विमान मिळाले नाही, असा गौप्यस्फोट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही विलिनीकरणाची चर्चा सुरु होती आणि तारीख सुद्धा ठरली होती, अशी माहिती आज दिली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत. छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांच्या खासदारकीवर सुद्धा भुजबळ यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
जयंत पाटील म्हणाले की, विलिनीकरणासाठी 12 फेब्रुवारी तारीख का ठरली होती कारण दोन्ही पक्ष आधी एकत्रित करायचे मग नंतर बाकीचे निर्णय घ्यायचे असे अजितदादांच्या मनात होतं. या चर्चेमध्ये सुप्रिया सुळे यांना आवर्जून घेतलं होतं, सुनेत्रा वहिनींचा आज शपथविधी होतोय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे; मुख्यमंत्र्यांची त्याला संमती असल्यानेच हा निर्णय होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निर्णय सध्या प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ सध्या घेता आहेत असे दिसतं, राष्ट्रवादी एकीकरणाच्या निर्णयाबाबत अजितदादांनी बाकीच्या नेत्यांना मी सांगितलं की एकमताने निर्णय होतो असं अजितदादांचे मत होतं.
त्यांनी सांगितले की, नियती किती क्रूर असू शकते हे अजितदादांच्या घटनेवरून दिसून येतं, पण विमान हवेत असताना विमानातून मोठा आवाज येत होता असं तेथील एका सरपंचांना मला सांगितलं होतं, विमानामध्ये काय प्रॉब्लेम होता, का नव्हता याबाबत ब्लॅक बॉक्समधून जे समोर येईल त्यातून काही गोष्टी समोर येतील. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील आणि माझ्यामध्ये कधी एकमेकांशी स्पर्धा झाली नाही, असे ते म्हणाले. आता राष्ट्रवादी एक येण्याबाबत विचारला असता ते म्हणाले की, मी ज्या नेतृत्वासोबत चर्चा करत होतो तेच नेतृत्व आता नाही, आता ज्यांच्याकडे पक्षाचा निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्यांनी आता तो निर्णय घेऊन अजित दादांचे शेवटचे स्वप्न पूर्ण करावे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, राजकारणामध्ये मर्यादा कशा सांभाळायच्या याचे उत्तम ज्ञान अजित दादांना होतं. अजितदादाही कधी माझ्यावर मर्यादा सोडून बोलले नाहीत ना मी कधी त्यांच्यावर मर्यादा सोडून बोललो. अजित पवार जर मुख्यमंत्री झाले असते तर दादांनी महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे काम केलं असतं, एकदा काम ठरलं की त्याचे अंमलबजावणी कशी करायची यामध्ये अजितदादांचा हातखंडा होता त्यामुळे अजित पवार एक चांगले मुख्यमंत्री बनले असते. अजित पवार यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची सर्वांना बुद्धी देवो हेच मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझे आवाहन असेल. माझ्या पक्षात मी जे म्हणेल तेच ठरेल, एकही आमदार विरोधात जाणार नाही असा अजितदादांचा ठाम विश्वास होता, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या