Sunil Tatkare: जनतेची भावना लक्षात घेता सुनेत्रा वहिनी पवार यांची निवड विधिमंडळ पक्षेनेतेपदी केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली असून दोन वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल, त्यामध्ये औपचारिकता आहे ती पार पडेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मात्र, विलिनीकरण संदर्भात तटकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तटकरे म्हणाले की, ज्यावेळी कृषी प्रदर्शन बारामतीमध्ये झालं तेव्हा ती चहापानासाठी बैठक झाली. त्यानंतर दस्तूरखुद्द आदरणीय अजित दादांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली असा खुलासा त्यांनी केला. विलीनीकरणाबाबत म्हणाले की, त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दल स्वतः अजित दादांनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये माहिती दिली आहे.
दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा व्हिडिओ जारी केला आहे. ही बैठक 17 जानेवारी झाली होती. त्या बैठकीचा व्हिडिओ आज समोर आला. मात्र, ही बैठक विलिनीकरणासाठी नव्हती, तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात होती, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे. विधीमंडळ नेतेपदी निवड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत पत्र मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, असे तटकरे म्हणाले. ते म्हणाले की, दादांचा अस्थिकलश महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये दर्शनासाठी पाठवणार आहोत. महाराष्ट्राला गतिमान विकासाभूत करण्याचे त्यांचे नेतृत्व विलक्षण पद्धतीचं राहिलं. झपाटल्यासारखं काम करत सबंध महाराष्ट्राला जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या सबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून नेला जाणार आहे.
दुसरीकडे, गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीवरून अंतर्गत पातळीवर चर्चा सुरु होत्या, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाची घोषणा होणार होती, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. 17 जानेवारी रोजी गोविंदबागेत शरद पवार यांच्या उपस्थित दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली होती. या चर्चेत राष्ट्रवादीकडून केवळ अजित पवार होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार उपस्थित होते. या बैठकीचा व्हिडिओ आज समोर आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या