तात्या लांडगे
सोलापूर : शालेय शिक्षण विभागाकडून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता अंतिम करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. १५ मार्च २०२४ रोजी निघालेल्या शासन निर्णयानुसारच संचमान्यता झाली आहे. त्यानुसार नववी आणि दहावीच्या वर्गात किमान २० विद्यार्थी नसतील तर ते वर्ग बंद होणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय काढून शिक्षक पदांसाठी विद्यार्थी संख्या निश्चित केली. त्यानुसार आता ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आणि ९० विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक मिळणार आहेत. ६० ते ८९ विद्यार्थी असले तरीदेखील तिसरा शिक्षक मिळणार नाही. या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना, काही शिक्षकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर राज्य शासनाने म्हणणे सादर केले आणि न्यायालयाने शासनाचा संचमान्यतेचा निर्णय मान्य केला.
रीपण, शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांचा या निर्णयाला विरोध कायम आहे. आता आठ-दहा दिवसांत संचमान्यता अंतिम झाल्यावर पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या समोर येईल. राज्यातील माध्यमिक शाळांवरील साधारणत: दहा हजारांवर शिक्षक अतिरिक्त ठरतील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
मुख्याध्यापकांची अट शिथिल, पण...
शालेय शिक्षण विभागाचा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय उच्च न्यायालयानेही ग्राह्य मानला आहे. त्यामुळे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता याच शासन निर्णयानुसार होईल. नववी-दहावीच्या वर्गात किमान २० विद्यार्थी आवश्यक आहेत. दुसरीकडे मुख्याध्यापक पदासाठी १५० विद्यार्थ्यांची अट शिथिल करून ती १०० विद्यार्थी करण्यात आली आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
शाळा सुरू होण्यापूर्वी अतिरिक्तांचे समायोजन
दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ जूनपासून शाळा तथा शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल. तत्पूर्वी, २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन होणार आहे. शालेय शिक्षण विभागाने २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्यांचे डिसेंबर २०२५ अखेर समायोजनाचा आदेश काढला होता. पण, दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर असल्याने आणि कमी पटाचे वर्ग बंद झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल म्हणून तो आदेश रद्द केला. आता २०२५-२६ च्या संचमान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पुढील चार महिन्यांत समायोजन केले जाणार आहे.