Sunetra Pawar DCM Oath : राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळ्यावेळी अजित पवार अमर रहे अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार शपथ घेत असताना कार्यकर्त्यांनी अजित पवार अमर रहे अमर रहे च्या घोषणा दिल्या. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश आमदार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला महायुतीमधील पक्षांचे इतर नेते देखील उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत (Ajit Pawar Death Plane Crash) निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आज सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले होते. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीची गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण बैठक विधीमंडळात पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली.