उत्तराखंडची गरुडझेप! 'विंग्स इंडिया २०२६' मध्ये ठरले देशातील सर्वोत्तम राज्य, नक्की काय आहे कारण?
esakal February 01, 2026 10:45 AM

हैदराबाद येथे पार पडलेल्या 'विंग्स इंडिया २०२६' या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक परिषदेत उत्तराखंडने मानाचा किताब पटकावला आहे. विमान वाहतूक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्तराखंडला "बेस्ट स्टेट फॉर प्रमोशन ऑफ एव्हिएशन इकोसिस्टम" (विमान वाहतूक परिसंस्थेला प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम राज्य) हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावर झालेल्या एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तराखंड सरकारने विमान वाहतूक क्षेत्रासाठी तयार केलेली प्रभावी धोरणे आणि राबवलेले नवनवीन उपक्रम यांची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. यावेळी उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाचे (UCADA) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, हा पुरस्कार राज्याच्या सर्वसमावेशक विमान धोरणाचे यश आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागांना हवाई मार्गाने जोडण्याला सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. यामुळे केवळ पर्यटनाला चालना मिळाली नाही, तर आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य सेवांमध्येही मोठी सुधारणा झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि 'उडान' (UDAN) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे उत्तराखंड आता देशातील एक महत्त्वाचे 'एव्हिएशन हब' म्हणून उदयास येत आहे. या पुरस्कारामुळे राज्यात भविष्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.