उत्तर प्रदेशच्या प्रशासकीय वर्तुळात मंगळवारी एक अत्यंत अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केलेल्या टीकेमुळे व्यथित होऊन जीएसटी विभागाचे उपायुक्त (Deputy Commissioner) प्रशांत सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. "मुख्यमंत्री माझे बॉस आहेत आणि त्यांच्याबद्दलचा अपमान मी सहन करू शकत नाही," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रशांत सिंह यांनी राज्यपालांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून प्रयागराजमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत अपमानजनक टिप्पण्या केल्या आहेत. या विधानांमुळे एक सरकारी कर्मचारी आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांचे मन दुखावले गेले आहे.
'राजकीय धर्म' आणि नैतिक कर्तव्यउपायुक्तांनी आपल्या राजीनामा पत्रात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. "मी राज्य सरकारचा कर्मचारी आहे. या सरकारने मला आजीविका दिली असून माझ्या कुटुंबाचे पालनपोषण यातूनच होते. त्यामुळे माझ्या सरकारच्या प्रमुखाचा अपमान होत असताना शांत बसणे हे माझ्या 'राजकीय धर्मा'च्या विरुद्ध आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. शंकराचार्यांची टिप्पणी केवळ व्यक्तीवर नसून ती राज्य, संविधान आणि लोकशाही व्यवस्थेच्या विरुद्ध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गंभीर आरोप आणि षडयंत्राचा दावाप्रशांत सिंह यांनी आपल्या पत्रात शंकराचार्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते शंकराचार्य हे समाजात जातिवादाचे विष कालवत असून देश आणि प्रदेश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. भोळ्या अधिकाऱ्यांना प्रलोभने देऊन सरकारविरुद्ध कट रचला जात असल्याचा दावाही त्यांनी पत्रात केला आहे.
पदावरील कर्तव्याची जाणीवराजीनामा दिला असला तरी, जोपर्यंत तो स्वीकारला जात नाही, तोपर्यंत राज्याच्या महसूल वाढीसाठी आणि आपल्या कर्तव्यासाठी ते कटिबद्ध राहतील, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी आपला राजीनामा अपर आयुक्त ग्रेड-१ संतोष कुमार यांच्याकडे सोपवला आहे.
एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने सरकारच्या समर्थनासाठी आणि मुख्यमंत्री-पंतप्रधानांवरील टीकेचा निषेध म्हणून पदाचा त्याग करण्याची ही पहिलीच वेळ असावी. या घटनेमुळे आता प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात शंकराचार्यांची विधाने आणि एका अधिकाऱ्याची निष्ठा यावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.