Sunetra Pawar Takes Oath As Deputy CM Of Maharashtra: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यामुळे सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. लोकभवन येथे झालेल्या या शपथविधीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते. यावेळी 'अजितदादा पवार अमर रहे', 'सुनेत्रा पवार तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!' अशा घोषणा अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले होते. या पदावर आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. आज दुपारी झालेल्या राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर लगेच सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला.
शपथविधीसाठी इतकी घाई का केली? असा सवाल उपस्थित केला जात असल्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''आज चौथा दिवस आहे ठीक आहे, तुम्ही सांगा, किती दिवसांनी शपथविधी करायचा होता?'' असा उलट सवाल भुजबळ यांनी पत्रकारांना केला. राज्याला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. अजितदादांचा अपघात डोळ्यासमोर जात नाही. पण वहिनींनी हे दुःख पचवून पक्षाच्या कामासाठी पुन्हा उभे राहण्याचे ठरवले आहे. ही मोठी गोष्ट आहे, असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून शुभेच्छापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ''महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पूर्ण करतील.'' असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.