तब्बल दहा वर्षांनंतर विरोधीपक्षनेता
esakal February 01, 2026 10:45 AM

तब्बल १० वर्षांनंतर विरोधी पक्षनेता
वसई-विरार पालिकेत सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवणार
विरार, ता. ३१ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेच्या ११५ पैकी ७१ नगरसेवक बहुजन विकास आघाडीकडे आहेत, तर भाजपचे ४३ आणि एक शिवसेनेचा ४४ नगरसेवक महायुतीचे निवडून आले आहेत. त्यामुळे २०१५ नंतर तब्बल १० वर्षांनंतर पालिकेत विरोधी पक्षनेता असणार आहे.
वसई-विरार पालिकेची पहिली निवडणूक २०१० मध्ये झाली. त्या वेळी बहुजन विकास आघाडीने सत्ता स्थापन करीत पहिला महापौर बसवला होता. जनआंदोलन समिती बॅनरखाली विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत पालिकेची निवडणूक लढवली होती. जनआंदोलन समितीला सत्ता स्थापन करता आली नाही, परंतु विरोधी बाकावर बसण्याची संधी मिळाली. २८ जून २०१० ते २८ जून २०१५ दरम्यान विनायक निकम विरोधी पक्षनेता होते. २०१५ मध्ये दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी १०६ जागा जिंकल्या. भाजप, शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांचे निवडून आलेले नगरसेवक एक अंकी संख्या पार करू शकले नाहीत. परिणामी, २०१५ ते २०२० कालावधीत विरोधी पक्षनेतापद रिक्त राहिले. त्यानंतर प्रशासकीय राजवटीमुळे पुढील पाच वर्षांच्या काळात निवडणुका झाल्या नाहीत.
़़़़़़ः--------------------------------
‘या’ नावांची चर्चा
भाजपने गटनेता म्हणून अशोक शेळके यांना संधी दिली आहे. विरोधी पक्षनेता नावासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांच्यासह मनोज पाटील, महेश सरवणकर यांची नावे चर्चेत आहेत. बहुजन विकास आघाडीकडे सत्ता राहणार असली तरी, विरोधी बाकावर मोठी संख्या असणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी भाजप ताकदपणाला लावणार असल्याचे दिसत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.