जळगाव: महापौरपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) यासाठी आरक्षण निघाल्यानंतर गतिमान झालेल्या भाजपतील हालचाली आता थंडावल्या आहेत. गेल्या काही दिवसांत महापौरपदासाठीच्या नावावर भाजपत अंतर्गत बराच खल झाल्यानंतर अखेरीस या पदासाठी प्रभाग क्रमांक सातमधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला काळेंचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. पक्षश्रेष्ठींनी काळेंच्या नावाला हिरवा कंदील दिला असला तरी त्याची अधिकृत घोषणा सोमवारी (ता. २) होऊ शकते.
जळगाव महापालिकेची निवडणूक भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस या राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीने दणक्यात जिंकली. ७५ पैकी तब्बल ६९ जागा जिंकून महायुतीने विरोधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, कॉंग्रेस व अन्य आघाड्यांचा सुपडा साफ केला.
६९ मध्ये भाजपने १०० टक्के स्ट्राइक रेट राखत ४६ जागा काबीज केल्या. शिवसेनेस २२ व एका अपक्षाचा पाठिंबा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला १ जागा असे महायुतीचे संख्याबळ सध्या सभागृहात आहे. सभागृहात भाजप ‘मोठा भाऊ’ असल्याने भाजपचा महापौर होणे अटळ आहे. त्यातच गेल्या आठवड्यात २२ जानेवारीस महापौरपदासाठी आरक्षण जाहीर होऊन, जळगावचे महापौर पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी निघाले. त्यानुसार ज्येष्ठ नगरसेविका म्हणून प्रभाग ७ मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला काळे, प्रभाग १२ मधून बिनविरोध निवडलेल्या उज्ज्वला बेंडाळे यांचे नाव आघाडीवर होते. प्रभाग १३ मधून बिनविरोध निवडून आलेल्या वैशाली अमित पाटील यांच्या नावाचीही चर्चा होती.
मात्र, ज्येष्ठता व अनुभव तसेच पक्षांतर्गत योगदान पाहता भाजपतील पक्षश्रेष्ठींनी दीपमाला काळेंच्या नावास पसंती दिल्याचे समजते. पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात होते. त्यांनी यासंदर्भात आमदार सुरेश (राजूमामा) भाळे व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून काळेंच्या नावास हिरवा कंदील दर्शविल्याचे सांगितले जात आहे.
एकेका वर्षासाठी मिळेल संधी
भाजपने महापौरपदासाठी प्रभाग व सामाजिक रचनेस महत्त्व देताना एकेका वर्षासाठी संधी देण्याचे धोरण ठरविल्याचेही समजते. त्यानुसार पहिल्या अडीच वर्षांत तीन महिलांना संधी मिळेल. त्यात पहिली दोन्ही वर्षे दोन, तर उर्वरित ६ महिन्यांसाठी तिसऱ्या महिलेस संधी मिळू शकेल. पुढच्या अडीच वर्षांत आणखी तिघांना त्यावेळी निघालेल्या आरक्षणानुसार संधी मिळू शकेल. अद्याप या धोरणावर स्पष्टता झालेली नाही.
प्रफुल पटेल NCP अध्यक्ष झाले हे कुणी सांगितलं? पियूष गोयल यांनी स्पष्टीकरण देत व्यक्त केली दिलगिरीपक्षांतर्गत दोघा- तिघांच्या नावावर चर्चा सुरू आहे. ज्येष्ठता, पक्षातील योगदान आणि अनुभव अशा तिघा निकषांनुसार आम्ही नाव ठरवतोय. अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. राजूमामा व अन्य पदाधिकाऱ्यांशी बोलून दोन दिवसांत नाव निश्चित होईल.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री, महाराष्ट्र
महापौरपदासाठी सोमवारी आमचे उमेदवार अर्ज भरतील. दोन दिवसांत आम्ही नाव निश्चित करू. निष्ठा, पक्षातील योगदान आणि अनुभव अशा तिघा पातळींवर पात्र ठरणारा योग्य उमेदवार देऊ.
- सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार, जळगाव शहर