शहराच्या मध्य भागातून नदी वाहणे हे निसर्गाचे लेणे मानले जाते, मात्र धुळेकरांसाठी हे ‘पांझरा भाग्य’ केवळ राजकीय, प्रशासकीय भाषणांपुरतेच मर्यादित दिसते. एकेकाळची वैभवशाली जीवनवाहिनी आज प्रशासकीय अनास्था आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या पांझरेसोबत सेल्फी काढणारी गर्दी इतर वेळी मात्र तिच्या दुरवस्थेकडे पाहून हळहळते. पांझरामाईचे, धुळेकरांचे हे दुःखमयी पडसाद लोकप्रतिनिधींच्या कानी पडणार की पुढील चार वर्षांत पुन्हा आश्वासनांच्या पुरातच वाहून जाणार?
सेल्फीपुरतेच उरले प्रेम!
अक्कलपाडा (ता. साक्री) प्रकल्प ओव्हरफ्लो झाला किंवा अतिवृष्टी झाली, तरच पांझरा प्रवाहित होते. अशा वेळी पांझरेचे रौद्र आणि देखणे रूप डोळ्यात साठवण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करतात, सेल्फी काढतात. मात्र, पावसाळा संपला की हे पात्र पुन्हा कचरा आणि सांडपाण्याचे केंद्र बनते. गेल्या पाच दशकांत एकाही लोकप्रतिनिधीला किंवा प्रशासनाला या नदीत ठिकठिकाणी बंधारे बांधून तिचे रूप बारमाही खुलते ठेवावे, असे का वाटले नाही? हा सुज्ञ धुळेकरांचा प्रश्न आहे.
नवे नेतृत्व, जुन्याच अपेक्षा
सध्या धुळे शहराची धुरा आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे आहे. पांझरा काठावर ‘शक्तीपीठ’ उभारण्याचा त्यांचा मानस स्वागतार्ह आहे. तसेच जिल्ह्याला जयकुमार रावल यांच्या रूपाने वजनदार पालकमंत्री लाभले आहेत. त्यांच्याकडून धुळेकरांना मोठ्या अपेक्षा आहेत. पांझरेच्या पात्रात ठिकठिकाणी दोन- चार का होईना बंधारे साकारून तिची अवहेलना थांबवणे, हे या नेत्यांसमोर मोठे आव्हान आहे.
‘नदी सुधार’चे स्वप्न अधुरेच
धुळे शहर विकासासाठी पांझरा नदी सुधार प्रकल्प (सुमारे ३५० कोटी रुपये) कागदावर आखला गेला. केंद्र सरकारकडून निधी मिळवून नदीचे सुशोभीकरण आणि प्रदूषणमुक्तीचे स्वप्न दाखवण्यात आले. परंतु, महापालिकास्तरावरून झालेल्या वल्गना हवेतच विरल्या. देवपूर भागातील ४० हजार घरांचे सांडपाणी शुद्ध करून या नदीत सोडण्याचा दावा करणाऱ्या महापालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आजही कार्यान्वित झालेला नाही. परिणामी, सांडपाणी थेट पात्रात मिसळून अस्वच्छतेसह पर्यावरण, आरोग्याचा प्रश्नही गंभीर होतो.
पर्यटनाची मोठी संधी
पांझरा नदीवर काही ठिकाणी आणि खानदेशची कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिराजवळ जर सुसज्ज बंधारा साकारला, तर या परिसराचा कायापालट होऊन तो एक उत्तम पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो. यामुळे शहर सौंदर्यात भर पडण्यासोबत स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज असेल.
१२० कोटी खर्चूनही बारमाही प्रकल्प बासनात
पांझरा नदी तापी नदीची उपनदी आहे. ती धुळ्यापर्यंत पूर्व वाहिनी, पुढे उत्तरेला संगमापर्यंत जाते. केंद्रीय राष्ट्रीय समविकास योजनेंतर्गत बारमाही प्रकल्पात पांझरेचा समाविष्ट झाला, तेव्हा १६ हजार किलोमीटर क्षेत्र विकास, टंचाईमुक्तीचे प्रयत्न, तसेच ९८.५ टक्के पाणलोट क्षेत्र विकासाचे उद्दीष्ट होते. मात्र, हा प्रकल्प राजकारणामुळे बासनात गुंडाळला गेला. तज्ज्ञांच्या मते, पांझरा खोऱ्यात ३१४ दलघमी भूपृष्ठीय पाणी वापरण्याची मुभा असताना, केवळ १८६ दलघमी पाण्याचाच वापर होतो. उर्वरित १२८ दलघमी पाणी थेट वाहून तापीमार्गे अरबी समुद्राला मिळते. हे पाणी जर शहराच्या हद्दीत योग्य नियोजनाने अडवले, तर भूजल पातळी आणखी वाढून धुळ्याचा पाणीप्रश्न सुटू शकतो.
Girish Mahajan : 'बाबासाहेबांच्या संविधानामुळेच भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही'; आंबेडकरांबद्दल काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन?दृष्टिक्षेपात पांझरा नदी
उगम स्थान : शेंदवड (ता. साक्री, जि. धुळे)
संगम : मुडावद (ता. शिंदखेडा- तापी नदीत)
जीवनवाहिनीची एकूण लांबी : १३६ किलोमीटर
केंद्र सरकारचा २००८ चा बारमाही प्रकल्प...पण
१२० कोटींचा निधी मिळूनही आरोपांमुळे बासनात
सद्यःस्थितीत अस्वच्छता, सांडपाण्याचाच विळखा
धुळेकरांना भाग्यरूपी नदीच्या सुशोभीकरणाची प्रतीक्षा