पैशाच्या थकबाकीवरून प्राणघातक हल्ला
वागळे इस्टेट परिसरात तरुण गंभीर जखमी; तीन आरोपींविरुद्ध श्रीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
ठाणे, ता. १ : घराचे अर्धवट राहिलेले काम आणि त्याचे पैसे परत मागण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर कोयता आणि कुकरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना वागळे इस्टेटमधील वारली पाडा येथे घडली आहे. या हल्ल्यात प्रकाश जाधव हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ठाणे जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
तक्रारदार शिवा सोन्या देवरस (२५) आणि जखमी प्रकाश जाधव यांनी लक्ष्मण भालशंकर याला घराच्या दुसऱ्या माळ्याचे काम दिले होते. काम अर्धवट राहिल्याने लक्ष्मणने घेतलेले पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. ३० जानेवारीला रात्री पावणेबाराच्या सुमारास जेव्हा शिवा आणि प्रकाश पैसे घेण्यासाठी लक्ष्मणच्या घरी गेले, तेव्हा वादाला सुरुवात झाली. पैसे मागताच लक्ष्मण आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. लक्ष्मणने प्रकाश जाधव यांना धक्का देऊन खाली पाडले आणि घरातील कुकरने त्यांच्या डोके व शरीरावर आघात केले. जीव वाचवण्यासाठी दोघेही घराबाहेर पळाले, मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग करून जवळील मैदानाजवळ त्यांना गाठले. तिथे एका जाडसर आरोपीने कोयत्याने प्रकाश यांच्या कपाळ आणि नाकावर वार केले.
सोन्याची साखळी चोरीला
झटापटीत आणि हल्ल्यादरम्यान प्रकाश जाधव यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची साखळीही गहाळ झाली आहे. गंभीर जखमी अवस्थेत प्रकाश यांनी पोलिस ठाणे गाठले. जिथून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लक्ष्मण भालशंकर आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.