मोठी बातमी: बजेटनंतर एकाच दिवसात सोने 5800 रुपयांनी घसरले, चांदीचा भाव गडगडला; 10 ग्रॅम सोन्याच
Marathi February 02, 2026 03:25 PM

सोन्याचांदीचा आजचा दर: बजेटनंतर दुसऱ्याच दिवशी सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार सुरू आहेत.  केंद्रीय अर्थसंकल्पानंतर दरात किमतींमध्ये बदल  होईल असा अंदाज असताना सलग तिसऱ्या दिवशी सोनं तब्बल 5800 रुपयांनी घसरलं आहे. तर चांदीच्या किमती कालच्या तुलनेत 23 हजार 980 रुपयांनी कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किमती जवळजवळ 4 टक्क्यांनी घसरल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या दरांवर काहीतरी परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता . मात्र अर्थसंकल्पात सोने व चांदी संबंधित कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र तरीही जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम स्थानिक सराफा बाजारांवर स्पष्टपणे जाणवत आहे. जागतिक बाजारात सोन्या चांदीच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारातही दर घसरले आहेत . (Gold Silver Price today)

सोन्या चांदीचे दर किती ?

बुलियनस असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचे कालचे दर ( 1 फेब्रुवारी 2026) हे 1 लाख 48 हजार 240 रुपये होते. हा दर आज एक लाख 42 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा झाला आहे. एका दिवसात सोन्याच्या किमतींमध्ये 5890 रुपयांचा फरक झाला आहे. सोन्याच्या किमती घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे . मात्र गेल्या काही दिवसांचा सोने खरेदीचा ट्रेंड पाहता गुंतवणूकदारांना मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे.

देशांतर्गत बाजारात गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात प्रचंड वाढ झालेली दिसली. आठवडाभरापूर्वी चांदीच्या दराने 330000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. काल (1 फेब्रुवारी ) चांदीचा किलोमागे असणाऱ्या दर 2 लाख 66 हजार 500  रुपयांवर होता. सध्या किलोमागे चांदीची किंमत 2 लाख 42 हजार 520 रुपयांवर गेली आहे. एका दिवसात चांदीच्या दरात 23 हजार 980 रुपयांची घसरण झाली आहे.

काय आहेत सोन्या चांदीच्या घसरणीचे कारणे ?

गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. अनुभवी गुंतवणूकदारांनाही या चढ – उतारांनी फसवलं. जागतिक तणाव, कमकुवत होत चाललेली चलने आणि अमेरिकन फेडरल रिजर्वच्या स्वातंत्र्याबद्दलच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोने-चांदीकडे पाहिले. यामुळे सोन्या चांदीच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून येत आहे . जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारातही दर घसरले आहेत. काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प फेड चेअर म्हणून केविन वॉर्श यांना नेमण्याची योजना आखत आहेत. या बातमीनंतर डॉलर मजबूत होत असल्याची चर्चा आहे. याचा परिणाम सोन्या चांदीच्या ट्रेडवरही झालेला दिसतोय.

सुवर्णनगरीत ग्राहकांना दिलासा

काल 1,58,000  वर असलेले सोन्याचे दर हे जीएसटीशिवाय 151000 वर खाली आले असून एकाच दिवसात सात हजार रुपयांची घसरण झाल्याचं दिसून येत आहे. चांदीच्या दरात ही 10 हजार रुपयांची घसरण होऊन,काल 270000  रुपयावर असलेले चांदीचे दर हे 260000 इतक्या खाली आल्याने,सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला असला,तरी वाढत्या दरात सोने आणि चांदी खरेदी केलेल्या गुंतवणूक दारांना मात्र मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले आहे.

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.