Dog Attack: ट्युशनसाठी निघाला, वाटेतच कुत्र्याचा हल्ला, चिमुकल्याची महिनाभर जगण्यासाठी झुंज पण...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश
esakal February 02, 2026 01:45 PM

कैलास म्हामले

कर्जत : कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १० वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याचा तब्बल एक महिना उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामपंचायत व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मृत विद्यार्थ्याचे नाव ऋषिकेश देवेंद्र पवार (वय १०) असे असून तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील आसगे बौद्धवाडी, ता. लांजा येथील रहिवासी होता. सध्या तो कुटुंबासह गुरुश्रद्धा अपार्टमेंट, पोद्दार सोसायटीजवळ, गारपोली हद्दीत (उमरोली) वास्तव्यास होता. ३ जानेवारी २०२६ रोजी ऋषिकेश ट्युशनसाठी निघाला असताना समृद्धी कॉम्प्लेक्स परिसरात भटक्या कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांना प्रतिसाद न देता ३१ जानेवारी रोजी पहाटे सुमारे ३ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या एकाच कुत्र्याच्याहल्ल्यांच्या मालिकेत प्रसाद लोंगले, नागो घारे यांच्यासह अनेक नागरिक जखमी झाले होते. अधिकृतरीत्या तीन जखमींची नोंद असली तरी प्रत्यक्षात पाच ते सहा नागरिक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे. तसेच चिंचवली परिसरातही अलीकडे विद्यार्थ्याला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना समोर आली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.

स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा ग्रामपंचायत व प्रशासनाकडे तक्रारी करूनही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप केला जात आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आज एका निष्पाप मुलाचा जीव गेला, असा थेट आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. संतापाच्या भरात नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला.

“भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा, अन्यथा आणखी एक बळी जाईल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे. कुत्रे पकड मोहीम, लसीकरण, निर्बंधात्मक कारवाई व कायमस्वरूपी उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निष्पाप मुलाच्या मृत्यूनंतर तरी जबाबदार यंत्रणा जागी होणार का, असा सवाल आता उमरोली परिसरातून उपस्थित होत आहे.

“ग्रामपंचायतीकडे मर्यादित संसाधने आहेत. स्थानिक पातळीवर गावकरी व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”

- सुशांत पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत.

“ऋषिकेश पवार यांच्या मृत्यूस स्थानिक प्रशासन जबाबदार आहे. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या व्यक्तींवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तातडीने बंदोबस्त न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात येईल.”

- अनिकेत सावंत, समाजसेवक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.