Manoj Mukund Naravane | 'Four Stars of Destiny': लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चिनी घुसखोरीवरून आज मोदी सरकारविरोधात रुद्रावतार धारण केला. तब्बल 44 मिनिटे त्यांनी चिनी आक्रमणाचा आणि घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करताना माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित असलेल्या पुस्तकाचा संदर्भ दिला. तसेच मॅगेझीन सुद्धा त्यांनी सोबत आणले होते. मात्र, दोन्हीमधील संदर्भ संसदेत मांडण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्री किरण रिजिजू यांनीही विरोध केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांचे नाव राहुल गांधी यांनी घेतल्यानंतर त्याला सुद्धा विरोध केला. राहुल गांधी यांनी संसदेत राष्ट्रीय सुरक्षे संदर्भात मुद्दा मांडायचा नाही का? अशी विचारणा केली. नरवणे यांच्या पुस्तकात संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान यांचं कॅरेक्टर असल्याचे म्हणताच लोकसभा अध्यक्षांनी त्याला विरोध केला.
दरम्यान, Four Stars of Destiny पुस्तकाचे लेखक माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पुस्तक 2024 मध्ये प्रकाशित होणार होते, परंतु अद्याप ते प्रसिद्ध झालं नसल्याचे सांगितलं. नरवणे यांनी डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 या काळात भारताचे लष्करप्रमुख (Chief of Army Staff) म्हणून काम पाहिले. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सिक्कीममधील तरुण अधिकारी म्हणून चीनचा सामना करण्यापासून ते लष्करप्रमुख म्हणून गलवाण संघर्ष हाताळण्यापर्यंत विविध महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' (Four Stars of Destiny): हे जनरल नरवणे यांचे आत्मचरित्र (Memoir) आहे, जे सध्या चर्चेत आहे. हे पुस्तक एप्रिल 2024 मध्ये प्रकाशित होणार होते, परंतु अद्याप ते प्रसिद्ध झालेले नाही. सध्या ते ॲमेझॉनवर उपलब्ध नाही असे दाखवत आहे.
जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांनी पुस्तक लिहिण्याचे आपले काम पूर्ण केले असून प्रकाशकांनी संरक्षण मंत्रालयाकडून (MoD) परवानगी घेणे आवश्यक आहे. हे पुस्तक गेल्या एक वर्षापासून मंत्रालयाच्या छाननीखाली (Review) आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या पुस्तकांमध्ये संवेदनशील माहिती नसल्याची खात्री करणे ही एक प्रक्रिया आहे.
या पुस्तकात 'अग्निवीर' योजना आणि 2020 मधील गलवाण संघर्ष (ज्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते) यांसारख्या संवेदनशील विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत 'द कारवाँ' मासिकातील एका अहवालाचा संदर्भ दिला, ज्यात या पुस्तकातील गलवाण आणि चिनी रणगाड्यांच्या हालचालींबाबतचे दावे उद्धृत केले होते. राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केला असता, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. राजनाथ सिंह यांनी पुस्तक अद्याप प्रकाशित झाले नसल्यामुळे त्याचा संदर्भ संसदेत देता येणार नाही, असे म्हणाले.
पुस्तकाच्या विलंबाबाबत बोलताना त्यांनी एका कार्यक्रमात मिश्किलपणे म्हटले की, हे पुस्तक "जुन्या वाईनप्रमाणे" (aged wine) मुरत आहे आणि जेवढा जास्त वेळ जाईल, तितके त्याचे मूल्य वाढत जाईल. त्यांचे 'द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरेसी' (The Cantonment Conspiracy) नावाचे एक लष्करी थरारपट (Military thriller) पुस्तक मार्च 2025 मध्ये प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक दोन लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या एका हत्या प्रकरणाच्या तपासावर आधारित काल्पनिक कथा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या