नवी दिल्ली : पाकिस्तानने 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणारा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारनं याबाबत रविवारी घोषणा केली. आयसीसीकडून पाकिस्तानवर भारताविरुद्ध सामना न खेळल्यास दंड लावला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. आयसीसीसमोर पाकिस्तानवर बंदी घालण्याचा देखील पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी मोठा दावा केला आहे. ते एबीपी न्यूज सोबत बोलत होते.
दक्षिण आशियात म्हणजे भारत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथं जे सरकार सांगतं तेच होतं. सरकारचा निर्णय अंतिम असतो. एक क्रिकेटर म्हणून आम्हाला सरकारचं ऐकावं लागतं. याची सुरुवात भारतानं केली होती. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानमध्ये होते तेव्हा भारतानं पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. मात्र, 2023 ला पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. जय शाह तेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होते, ते म्हणाले होते की तुम्ही वर्ल्ड कप खेळण्यास या आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी येऊ. मात्र जय शाह बीसीसीआयमधून आयसीसीत गेले आणि त्यांनी त्यांचं आश्वासन पाळलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेल पद्धतीनं आयोजित करण्यात आली, असं बासित अली म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर आशिया कपचे सामने झाले. आशिया कपमध्ये दोन्ही संघ खेळले कारण त्यात ब्रॉडकास्टरचे पैसे लागले होते. मात्र, टीम इंडियानं मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी का स्वीकारली नाही हे कोणीतरी सांगावं, असं बासित अली म्हणाले. ट्रॉफी तर आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष म्हणून देणार होते. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियानं वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ट्रॉफी पंतप्रधानांच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिला असता तर काय झालं असतं. मात्र, भारतीय संघानं तिथं ट्रॉफी घेतली नाही कारण सरकारचा निर्णय होता. आता पाकिस्तान सरकारला वाटलं की बांगलादेश सोबत जे घडलं ते चुकीचं झालं, त्यामुळं आम्ही भारताविरुद्ध खेळणार नाही, असं बासित अली म्हणाले. पाकिस्तान त्यांच्या निर्णयावरुन यूटर्न घेणार नाही, असं देखील बासित अली म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान अंडर -19 सामना सकाळी सुरु झाला होता. भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय उशिरानं झाला. पाकिस्तान सरकारनं सायंकाळी 7 वाजता निर्णय घेतला, असं बासित अली म्हणाले.
बासित अली म्हणाले की पाकिस्तान आता कोणताही सामना भारताविरुद्ध खेळणार नाही. 15 फेब्रुवारीचा सामना असो किंवा टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना असो, पहिल्यांदा टाळी दोन्ही हातानं वाजली होती. आता आयसीसी टाळी एका हातानं वाजवत आहे, कारण प्रक्षेपकांचा सर्वाधिक महसूल भारताकडे जातो. बीसीसीआय सर्वाधिक कमाई करतो, यामुळं आयसीसी बीसीसीआयच्या निर्णयांना होकार देते. मात्र, बांगलादेशनं काही म्हटलं तर आयसीसी नकार देते. आयसीसी सर्वांसोबत सारखा व्यवहार करत नाही, असा आरोप बासित अली यांनी केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला संघांचे सामने देखील यापुढे होणार नाहीत. आशिया कप देखील होणार नाही, आता आयसीसीचे डोळे उघडतील. पाकिस्तान सरकारचं समर्थन करत असल्याचं बासित अली यांनी म्हटलं.