Nashik Police : पोलिस प्रशासनाचे गंभीर अपयश; चोरीच्या दुचाकीचा 'स्क्रॅप'मध्ये लिलाव, चौकशीची मागणी
esakal February 03, 2026 03:45 AM

नाशिक: अपार्टमेंटमधून चोरी झालेल्या अन् पोलिसांच्या भाषेत हरविलेल्या दुचाकीची तक्रार नोंदवून न घेणे, वर्षभर फिरवणे आणि अखेर त्याच दुचाकीचा पोलिसांकडूनच स्क्रॅपमध्ये लिलाव होणे, हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून पोलिस प्रशासनाच्या गंभीर अपयशाचे जीवंत उदाहरण ठरत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, हीच दुचाकी आज खुलेआम रस्त्यावर सुसाट धावत असताना पोलिस मात्र, ‘आम्हाला काही माहिती नाही’ अशी भूमिका घेत आहेत. तक्रारदाराच्या रेट्यानंतर शुक्रवारी (ता. ३०) पिंपळगाव पोलिसांनी ती दुचाकी ताब्यात घेतली असली तरी दुचाकी परत देण्यासाठी आता नन्नाचा पाढा वाचत आहे.

पिंपळगाव बसवंत येथील तोसिफ शेख यांची दुचाकी (एमएच १५, डीटी ४५८५) ही ९ नोव्हेंबर २०२३ ला घोडकेनगर येथील अपार्टमेंटमधून चोरीला गेली. याबाबत शेख यांनी १४ नोव्हेंबर २०२३ रोजी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज सादर केला. मात्र, तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी त्यांना वर्षभर चकरा मारायला लावल्या.

दुचाकी पोहोचली स्क्रॅपपर्यंत

मार्च २०२५ मध्ये आडगाव पोलिसांनी या दुचाकीचा स्क्रॅपमध्ये लिलाव केला. कायदेशीर नियमानुसार, जप्त किंवा बेवारस वाहनांचा लिलाव करण्यापूर्वी मूळ मालकाचा शोध घेणे, आरटीओ तपासणी करणे आणि चोरीची नोंद आहे का याची खातरजमा करणे बंधनकारक असते. मग या प्रकरणात ही प्रक्रिया झालीच नाही की मुद्दाम टाळली गेली, असा प्रश्न उपस्थित होतो.

चोरीची तक्रार वेळेत दिली गेली असतानाही ती नोंदवली नाही, लिलावाआधी मूळ मालकाची खातरजमा केली नाही आणि आता सत्य समोर येऊनही दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व बाबी केवळ निष्काळजीपणाच्या पलिकडच्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण स्वतंत्र चौकशीची मागणी करत आहे. आज मूळ मालक तोसिफ शेख न्यायासाठी दरवाजे ठोठावत आहे तर चोरीची दुचाकी पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या आवारात मूळ मालकाच्या प्रतिक्षेत उभी आहे.

पोलिसांचे हात वर

७ ऑक्टोबर २०२५ ला शेख हे ओझर येथे गेले असता त्यांना स्वतःचीच चोरीस गेलेली दुचाकी रस्त्यावर धावताना दिसली. चौकशी केल्यावर संबंधित व्यक्तीने आडगाव पोलिसांच्या लिलावात ही दुचाकी आठ हजार ९०० रुपयांना स्क्रॅपमध्ये खरेदी केल्याचे म्हटले आहे. परंतु, तसे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे चोरीची दुचाकी पोलिसांच्या माध्यमातूनच ‘कायदेशीर’ बनवली गेली, असा धक्कादायक निष्कर्ष निघतो.

हा प्रकार समोर आणूनही पिंपळगाव पोलिसांनी जबाबदारी झटकत, ‘आम्हाला काहीच माहिती नाही,’ असे सांगत हात वर केले. ९ जानेवारी २०२६ ला पुन्हा पाठपुरावा केल्यानंतर संशयित खरेदीदाराला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पोलिस कारवाई का करीत नाहीत, स्वतःसह कुणाला वाचवले जात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे.

kolhapur ZP : निवडणूक जिंकण्याआधीच आर्थिक कसोटी; उमेदवारांची कसरत सुरू

हरवेली दुचाकी संबंधिताने स्क्रॅपमध्ये खरेदी केलेली आहे. खरेदीदार आणि तक्रारदार एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांना एकमेकांशी तडतोड करून दुचाकी देण्यास सांगितले आहे. हरवेली दुचाकी मूळ व्यक्तीला परत दिली आहे. २०२३ च्या तक्रार अर्जाबद्दल आपल्याला काही माहित नाही.

- प्रदीप देशमुख, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव पोलिसांनी संबंधिताला बोलावून दुचाकी देण्यास सांगितले आहे. मात्र, अद्याप दुचाकी मिळालेली नाही. २०२३ ला तक्रार देऊनही पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतलेली नाही.

- तौसिफ शेख, तक्रारदार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.