'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून गौरव मोरे हिंदीतल्या कॉमेडी शोमध्ये का गेला? सांगितलं खरं कारण
Tv9 Marathi February 03, 2026 07:45 PM

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून गौरव मोरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. अफलातून विनोदबुद्धी आणि अचूक टायमिंगच्या जोरावर त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या शोद्वारे प्रचंड लोकप्रियता आणि पैसा मिळत असतानाही त्याने मध्यंतरीच्या काळात यातून काढता पाय घेतला होता. हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव हिंदीतल्या ‘मॅडनेस मचायेंगे’ या कॉमेडी शोमध्ये झळकला होता. हास्यजत्रा सोडून हिंदीतला कॉमेडी शो करण्यामागचं नेमकं कारण त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘9 माईंड क्रिएशन’ला दिलेल्या मुलाखतीत गौरवने सांगितलं, “एकजण येतो आणि म्हणतो, तुमचा रोल मस्तय. तुम्ही येता.. मग कॉमेडी होते. ते विचारायचे की, सर तुम्ही या तारखेला आहात का? तुमच्यासाठी मस्त भूमिका आहे. त्यात हिरो-हिरोइन असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही येता.. घरात समस्या निर्माण होतात.. तुम्ही येता आणि मग कॉमेडी होते. सतत तेच तेच करून मला कंटाळा आला. म्हणून मी वर्षभर या कामातून ब्रेक घेतला. त्यादरम्यान मी ‘मॅडनेस मचायेंगे’चे एपिसोड केले होते. कारण हिंदीतून मला बोलावलं होतं. बाकी मला हे करायचं नाही, असं काहीच नव्हतं.”

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

गौरवने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘हास्य सम्राट’ यांसारख्या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला होता. पण अभिनय आणि कॉमेडीत फारसा अनुभव नसल्याने पुढे जाऊ शकलं नसल्याचं त्याने म्हटलं. अनेकदा तो स्थानिक कार्यक्रमांमध्ये स्टँड-अप परफॉर्म करायचा. “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने मला सर्वकाही दिलं. पैसा, प्रसिद्धी आणि स्थैर्य या गोष्टी मला शोने दिल्या. सध्या मी सर्वांत महागड्या मोबाइल फोनपैकी एक वापरतो. दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे बस किंवा ट्रेनने प्रवास करण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. आता माझ्याकडे कार आणि बाईक आहे. त्यावेळी माझ्याकडे शूज नव्हते. पण आता शूजचं कलेक्शन आहे. माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे काही मित्रांनी माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. पण आता तेच माझ्या घरी येतात आणि माझ्यासोबत सेल्फी किंवा फोटो क्लिक करतात,” अशा शब्दांत गौरव एका मुलाखतीत व्यक्त झाला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.