सुरक्षा नियमांची थट्टा
तारापूर औद्योगिक वसाहतीत कामगार वाऱ्यावर
बोईसर, ता. ३ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीत सुरक्षेचे मूलभूत नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. वारंवार घडणाऱ्या अपघातांनी अनेकदा सिद्ध झाले असून, अधिकारी, कारखानदारांच्या संगनमतातून होत असल्याचा आरोप कामगार संघटनांमधून होत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीत २,१०० भूखंड आहे. त्यातील १,८०० औद्योगिक तर ३०० निवासी आहेत. या परिसरात १२०० हून अधिक कारखाने, गोदामे कार्यरत आहेत. मात्र, बहुसंख्य कारखान्यांमधील सुरक्षाव्यवस्था तकलादू असल्याचे दिसत आहे. कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर उत्पादनाची माहिती, वापरली जाणारी रसायने, संभाव्य धोके, आपत्कालीन उपाययोजनांबाबत कोणताही फलक लावण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी तर भूखंड क्रमांकसुद्धा नसल्याने अपघात घडल्यावर अग्निशमन दल, पोलिस तसेच आपत्कालीन यंत्रणांना बचावकार्य अंधारात चाचपडत करावे लागते. त्यामुळे असे प्रकार खरोखरच कामगारांच्या सुरक्षेबाबतची अनास्थाच अधोरेखित करत आहे.
-----------------------------
कामगार संघटना आक्रमक
- दरवर्षी सुरक्षा सप्ताह साजरा करून फोटोसेशन करण्यात येते; पण प्रत्यक्षात कारखान्यांची तपासणी होत नाही, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. तसेच कामगारांच्या अपघाती मृत्यूनंतर ‘चौकशीचे आदेश’ देऊन प्रकरण थंडबस्त्यात टाकले जाते.
- संबंधित यंत्रणांनी तारापूरमधील सर्व कारखान्यांची तातडीने सखोल तपासणी करून नियम मोडणाऱ्या कारखानदारांवर कठोर कारवाई करावी अन्यथा पुढील होणाऱ्या प्रत्येक अपघाताला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.
---------------------------
रसायन निर्मिती - २५० ते ३००
औषधांचे कारखाने - ३५९ ते ४००
एकूण कारखाने - १,२००
---------------------------------
अपघातांची संख्या
मृत्यू - ११
जखमी - ९
--------------------------
तारापूर औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखाने सुरक्षा व पर्यावरण नियमांचे पालन करत नसल्यामुळे कामगारांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
- मोहित घरत, पर्यावरणप्रेमी
-------------------------
अनेक कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर उत्पादन व रसायनांची माहिती नसल्यामुळे आपत्कालीन प्रसंगी बचावकार्य करताना मोठ्या अडचणी येतात. प्रत्येक कारखान्याने सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
- वैभव तांडेल, अधिकारी, अग्निशमन दल