भंडाऱ्यातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश, मात्र काही तासातच प्रवेश रद्द, परिणय फुकेंनी का घेतला यू टर्न?
प्रशांत देसाई February 04, 2026 02:43 AM

Bhandra : राजकारणातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. नागपूरमध्ये भाजपचे आमदार परिणय फुके यांनी आज मोठ्या उत्साहात भंडारा जिल्ह्यातील काहींना भाजपात प्रवेश दिला. मात्र, प्रवेश घेतलेल्यांमध्ये काहींवर ED ची छापेमारी झाली तर, काहींवर गुन्हे दाखल असल्याची गंभीर बाब समोर आल्यानं पार पडलेला भाजपचा पक्षप्रवेश सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यानंतर आमदार फुकेंनी तातडीनं पाऊल उचलत हा पक्षप्रवेश रद्द केला आहे. 

पक्षप्रवेशाच्या काही तासांतच तो रद्द केल्याची घटना

नागपूर इथं आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी को-ऑपरेटिव्ह राईस मिलचे अध्यक्ष आणि लोभीचे सरपंच ठाकचंद मुंगुसमारे यांच्यासह अजय गहाणे, अनिल गौपाले, संतोष पुष्पतोडे, ऋषीकुमार गौपाले, तसेच रोहित मिर्चुले, अभिमन्यू ठाकरे, यश कोलते व वैभव देशमुख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या व्यक्तींच्या पक्षप्रवेशानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल आणि विविध तक्रारींबद्दल पक्षाकडे तक्रारींचा पाऊस पाडला. याची गंभीर दखल घेत आमदार परिणय फुके यांनी हा पक्ष प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू असून, पक्षप्रवेशाच्या काही तासांतच तो रद्द करण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. अजय गहाणे आणि रोहित मिर्चुले या दोघांवर नुकतीच वाळू व्यवसायासंदर्भात ED छापेमारी केली आहे. 

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भंडारा जिल्ह्यातील विश्वासू ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शंकर राऊत यांनी काँग्रेसला रामराम ठोकून सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. ​शंकर राऊत हे केवळ ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नव्हते, तर नाना पटोले यांच्या राजकीय रणनीतीमधील एक महत्त्वाचा दुवा मानले जात होते. हक्काच्या माणसानेच साथ सोडल्याने नाना पटोलेंना हा मोठा राजकीय आणि वैयक्तिक धक्का मानला जात आहे. भाजप नेते परिणय फुके व भाजपा जिल्हा अध्यक्ष आशु गोंडाने यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. परिणय फुके यांनी अत्यंत गुप्तपणे ही राजकीय खेळी यशस्वी केल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. शंकर राऊत यांच्या भाजप प्रवेशामुळे भंडारा जिल्ह्यात ओबीसी मतपेढीवर काँग्रेसची असलेली पकड ढिली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राऊत यांच्या येण्याने भाजपची ताकद जिल्ह्यात वाढल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

Uttam Jankar on Sunetra Pawar Oath: उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नाही, CM अथवा PM असते तर तातडीने शपथविधी मान्य होता पण...; शरद पवारांच्या आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.