ढेबेवाडी मंत्री जयकुमार गोरे तळमावल्यातील प्रचार सभा
esakal February 04, 2026 04:45 AM

पाटणचा सासूरवास संपविण्याची जबाबदारी आमची

तळमावल्यातील प्रचार सभेत मंत्री जयकुमार गोरे यांचा पालकमंत्र्यांचे नाव न घेता टोला

ढेबेवाडी, ता. ३ : ‘पाटण तालुक्यात शासकीय यंत्रणा विकासकामांसाठी की लोकांना त्रास देण्यासाठी आहे? असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. आता भाजपचे छत बच्चूदादांच्या डोक्यावर आहे, त्या सावलीत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. त्यामुळे सगळा सासूरवास संपविण्याची जबाबदारी आता आमची आहे,’ असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न घेता लगावला.
तळमावले (ता. पाटण) येथे भाजपचे काळगाव गटातील उमेदवार प्राजक्ता पाटील, रमेश मोरे, अनिल डाकवे, मंद्रुळकोळे गटातील उमेदवार डॉ. प्राची पाटील, नितीन पाटील, आकांक्षा खेडेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. वरील उमेदवारांसह आमदार डॉ. अतुल भोसले, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष भरत पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील, माजी सभापती उज्ज्वला जाधव, दीपकराव महाडिक, गणेश यादव, सुनंदा पाटील, अंकुश कापसे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींनी पक्ष, पार्टीच्या पलीकडे जाऊन जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे; परंतु इथे ते होताना दिसत नाही. जनतेला दुःखामध्ये लोटणारी शक्ती तयार झाली आहे; पण आता यापुढे कार्यकर्त्यांना त्रास देण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. सगळ्या संस्था ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. त्यामुळे टेन्शन घ्यायचे कारण नाही. गावखेड्याला जे- जे लागते ते ग्रामविकास खात्यातून मिळते, त्यामुळे कुणी त्रास देण्याचे कारण नाही.’’
डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘‘पाटण तालुक्याला सर्वाधिक निधी दिला आहे. या निवडणुकीत जनतेने त्याची पोच द्यावी. या भागातील भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा. सर्व ताकद आम्ही देऊ.’’ भरत पाटील म्हणाले, ‘‘या मतदारसंघातून आठ वर्षांपूर्वी जे निवडून गेले ते परत इकडे फारसे फिरकले नाहीत. आपले सर्व उमेदवार अभ्यासू, कर्तबगार व उच्चशिक्षित आहेत. त्यांना निवडून द्या. ते तुमचे प्रश्न तळमळीने सोडवतील.’’ अभिजित पाटील, रामभाऊ डुबल, प्राजक्ता पाटील, अनिल डाकवे, रमेश मोरे आदींची भाषणे झाली.
...............................

बार वाढले, शाळा बंद झाल्या
पाटण तालुक्यात दबावाचे राजकारण सुरू आहे. बारची संख्या वाढली; परंतु ३८ शाळा बंद झाल्या. समाजाला कुठे घेऊन हे निघालेत ते बघा, असा टोला सत्यजितसिंह पाटणकर यांनी लगावला.

---------------------
कोट
आम्ही दबावाचे राजकारण कधी केले नाही आणि करणार नाही. मी कुणाला त्रास देण्यासाठी किंवा चॅलेंज करण्यासाठी नव्हे, तर भाजप कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी इथे आलो आहे. सातारा जिल्हा परिषदेत आमची सत्ता आल्यात जमा आहे. स्वतःच्या ताकदीवरच सत्ता आणू.
- जयकुमार गोरे,
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री

फोटो :..........08074
तळमावले : प्रचार सभेत बोलताना जयकुमार गोरे समोर उपस्थित.
---------------------------

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.