साप्ताहिक, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरा मिळकतकर
esakal February 04, 2026 08:45 AM

पिंपरी, ता. ३ ः आर्थिक वर्ष संपायला केवळ दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे मिळकतकर वसुली मोहीम महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाने तीव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य कार्यालयासह १८ विभागीय करसंकलन कार्यालये शनिवार आणि रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाकडून मिळकतकर वसुलीची मोहीम सुरू आहे. शिवाय, थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. यात मालमत्ता जप्त करणे, नळजोड खंडित करणे यांचा समावेश आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर वेळेत भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. करसंकलनासाठी करसंकलन कार्यालये निगडी प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरीगाव, महापालिका भवन पिंपरी, फुगेवाडी दापोडी, भोसरी, चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे, दिघी आदी ठिकाणी आहेत.

इथे भरू शकता कर
- करसंकलन विभाग, मुख्य कार्यालय, पिंपरी
- १८ विभागीय कर संकलन कार्यालये
- ऑनलाइन पद्धतीने करभरणा सुविधा

‘‘महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाकडून विविध माध्यमांतून नागरिकांना मिळकतकर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांसाठी ऑनलाइन कर भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. करदात्यांनी कराचा भरणा करून शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.
- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

‘‘सार्वजनिक सुट्टीच्या दिवसांसह शनिवार व रविवारीसुद्धा सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ या वेळेत ३१ मार्चपर्यंत सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांतील रोख भरणा केंद्र (कॅश काउंटर) सुरू असतील. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्याची वेळ वाढवली आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
- सचिन पवार, उपायुक्त, महापालिका
---

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.