- प्रसाद कानडे
पुणे - पुणे-मुंबई व पुणे-हैदराबाद या बुलेट ट्रेनचा मार्ग हा दुहेरीकरणाचा असणार आहे. पुणे ते मुंबई मार्गावरील घाटामध्ये सुमारे ४५ किलोमीटरच्या अंतरावर बोगदे व पूल असतील. लोणावळ्यामध्ये स्थानक करणे शक्य नसल्याने लोणावळा स्थानक हे कामशेतच्या भागात असेल. शिवाय हिंजवडीतही बुलेट ट्रेनचे स्थानक प्रस्तावित आहे.
पुण्यात बुलेट ट्रेनचे स्थानक हे हडपसरच्या भागात होणार असून, स्थानकासाठी सुमारे चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. बुलेट ट्रेन ही ताशी ३५० किलोमीटर वेगाने धावते. त्यामुळे निर्माण होणाऱ्या हवेच्या पोकळीचा विचार करूनच विशिष्ट पद्धतीने स्थानक बांधले जाणार असल्याची माहिती ‘नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या’ वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून २०२१-२२ मध्ये मुंबई-पुणे-हैदराबाद या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) रेल्वे बोर्डाला सादर झाला. मार्गाच्या मंजुरीनंतर आता पुन्हा ‘डीपीआर’ची आवश्यकता नसून केवळ अवलोकन केले जाणार आहे.
निधीची उपलब्धता झाल्यानंतर बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात होईल. पुणे ते मुंबई व पुणे ते हैदराबाद या मार्गावर एकाच वेळी कामाला सुरुवात होईल. कामाला सुरुवात झाल्यावर ५ ते ७ वर्षांत बुलेट ट्रेनचा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
पुणे स्थानक ‘हडपसर’लाच का?
बुलेट ट्रेनचे स्थानक पुण्याच्या मध्यवर्ती भागात करण्यासाठी आवश्यक ती जागा नाही.
मध्यवर्ती भागातील जमिनीचे दर हे तुलनेने खूप जास्त, शिवाय भूसंपादनातदेखील मोठा अडथळा येण्याची शक्यता.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व मेट्रो सेवा हडपसर स्थानकाला जोडणे सोयीचे ठरणार.
पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनचा मार्ग हा काही ठिकाणी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणार
हडपसर हा भाग शहराच्या पूर्वेला, त्यामुळे तुलनेने जागा, वाहतूक कोंडी वा अन्य गुंतागुंतीचे प्रमाण कमी.
(या बाबींचा डीपीआरमध्ये विचार करण्यात आला आहे. )
ताशी ३५० किमी वेगाने धावणार
बुलेट ट्रेन ताशी ३५० किमी वेगाने धावणार.
एक किलोमीटरच्या ट्रॅकसाठी सुमारे २५० कोटींचा खर्च अपेक्षित.
उन्नत मार्ग हा काही ठिकाणी ७ मीटर उंचीवर, तर काही ठिकाणी १० मीटर उंचीवर.
पुणे ते मुंबई व पुणे ते हैदराबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सुमारे २ लाख कोटींचा खर्च अपेक्षित.
बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्यात पुणे ते मुंबई व पुणे ते हैदराबाद या मार्गाची निवड केली आहे. पहिल्या टप्प्यात देशात ४ हजार किलोमीटर अंतरावर बुलेट ट्रेन धावण्याची योजना आहे. दुसऱ्या टप्प्यात यात आणखी काही शहरे जोडली जातील. देशात ७ हजार किलोमीटरच्या अंतरावर बुलेट ट्रेन धावेल, असे आमचे नियोजन आहे.
- अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री, दिल्ली