ढिंग टांग : फाइव्ह स्टार्स ऑफ डेमॉक्रसी..!
esakal February 04, 2026 02:45 PM

बेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एंट्री घेत) ढॅणटढॅऽऽण... मम्मा, आयम बॅक..!

मम्मामॅडम : (पक्षकार्याची कागदपत्रे हातावेगळी करत) हं!

बेटा : (सहज विचारल्यागत) क्या पढ रही हो?

मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या भरघोस यशाचा अहवाल वाचतेय!

बेटा : (कुतूहलानं) वेळ लागेल का?

मम्मामॅडम : (तुटकपणे) अर्धं पान वाचायला कितीसा वेळ लागणार?

बेटा : (सल्ला देत) माझं ऐक, असलं किरकोळ काहीतरी वाचू नये माणसानं! चांगली पुस्तकंबिस्तकं वाचावीत! मी हल्ली ग्रंथवाचनावर भर द्यायचं ठरवलं आहे...

मम्मामॅडम : (आश्चर्याचा धक्का बसून) खरं की काय? वॉव!!

बेटा : (चष्मा काढून स्टायलीत हातात घेत) नुकतंच मी एक पुस्तक वाचून संपवलं!! फार छान आहे, यू शुड रीड दॅट बुक!!

मम्मामॅडम : (वाचनप्रेमाच्या नव्या उमाळ्यानं) कुठलं?

बेटा : (चष्मा पुन्हा स्टायलीत लावत) नियतीचे तारे चार...आय मीन, फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी..!

मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालत) हे पुस्तकाचं नाव आहे, की आपल्या पक्षाचा निवडणूक निकाल?

बेटा : (प्रगल्भ चेहरा करत) ऐन वेळी युद्धकाळात तुमचे हे छप्पन इंची छातीवाले कसे हात झटकून मोकळे होतात, त्याचे ढळढळीत पुरावे आहेत, या पुस्तकात!

मम्मामॅडम : (नाक मुरडत) त्यांचं नावही काढू नकोस! आमच्या देशाची वाट लावली, पक्षाची लावली आणि आता...

बेटा : (तावातावाने) पण या पुस्तकावर मला बोलूसुद्धा देत नाहीत! मी बोलायला लागलो तर मला विचारायला लागले, तुम्हाला हे पुस्तक कुठे मिळालं? ओरिजिनल आहे, की पायरेटेड? फूटपाथवर घेतलं का? लेखक कोण आहे? प्रकाशक कोण आहे? किती पानांचं आहे? किंमत किती आहे?...ऑल नॉन्सेन्स!! मी म्हटलं मारो गोली!! मी बोलणार!! पुस्तकावर अभिप्राय देणं हे माझं स्वातंत्र्य आहे...भले, मग मी ते वाचलेलं असो की नसो!!

मम्मामॅडम : (समाधानाने) ते काहीही असू दे, तुला वाचनाची गोडी लागली, याचाच मला खूप आनंद झालाय! लहानपणी मी तुला अभ्यासाची पुस्तकं आणून द्यायची, आणि-

बेटा : (कपाळ चोळत) शाळेतल्या आठवणी नको काढूस आता!! हल्ली मी खूप वाचतो! उदाहरणार्थ, या एका पुस्तकाचा मी काही मिनिटात फडशा पाडला!!

मम्मामॅडम : (पुन्हा कागदपत्रांकडे बघत) बरं बरं, तुझं वाचून झालं असेल तर मला आणून दे! मी वाचीन हो!!

बेटा : (खांदे उडवत) वेल, त्याला जरा वेळ लागेल! कारण ते अजून प्रकाशित व्हायचंय!!

मम्मामॅडम : (हादरून) तरीही तुझं वाचून झालं? कम्मालच आहे..!!

बेटा : (थंडपणाने) पुस्तक वाचण्यासाठी ते आधी प्रकाशित व्हावं लागतं, असा काही नियम आहे का? अनेक पुस्तकं तर प्रकाशित होऊनही कुणी वाचत नाही, मग एखादं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी कोणी वाचलं तर बिघडलं कुठं?

मम्मामॅडम : (चक्रावून) वाचायला आधी पुस्तक हातात तर हवं ना?

बेटा : (उडवून लावत) हॅ:!! वो पुरानी स्टाइल है!! मी सध्या आणखी एक बेस्टसेलर पुस्तक वाचतोय!! अफलातून आहे!! एकदा हातात घेतलं, की खाली ठेवावंसं वाटणार नाही…

मम्मामॅडम : (उत्सुकतेनं) कुठलं रे?

बेटा : (अभिमानाने) फाइव्ह स्टार्स ऑफ डेमॉक्रसी!! ऊर्फ पंचतारांकित लोकशाही!!

मम्मामॅडम : (कुतुहलानं) कोणी लिहिलंय? प्रकाशक कोण आहे?

बेटा : (दुप्पट अभिमानाने) प्रकाशन सोड, अजून लिहिलेलंसुद्धा नाही! मीच आहे लेखक! ढॅणटढॅऽऽण!!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.