Sangli Politics :'मिनी मंत्रालया'तून विधिमंडळात धडक! स्थानिक नेत्यांचा राज्यस्तरीय प्रभाव; चौघेजण झाले मंत्री
esakal February 04, 2026 02:45 PM

सांगली : ‘मिनी मंत्रालया’त आपल्या कामाचा प्रभाव पडणाऱ्या अनेक सदस्यांनी विधिमंडळातही दबदबा निर्माण केला. यात पाच अध्यक्षांचा समावेश आहे. शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक, आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे यांनी मंत्री पद भूषवले, तर बी. एस. कोरे, संपतराव माने, धोंडिराम पाटील आणि मोहनराव कदम या अध्यक्षांनाही विधिमंडळात संधी मिळाली.

जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हटले जाते. त्यामुळे या ‘मिनी मंत्रालया’त सदस्य म्हणून येणारा कार्यकर्ता हा येथे साधारणपणे विधिमंडळाचे धडेच गिरवतो. त्यामुळे मंत्रालयात जाण्यापूर्वीची प्राथमिक तयारी जिल्हा परिषद सदस्यांची होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Sangli Politics : जिल्हातील राजकारण कूस बदलतेय! नगरपालिका - नगरपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने नव्या चेहऱ्यांकडे नेतृत्व

यातूनच विधिमंडळात आपला प्रभाव पडणारे सदस्य पुढे जाऊन आमदार झाले आहेत. अशा ‘मिनी मंत्रालया’तून विधिमंडळात धडक मारणाऱ्या सदस्यांची संख्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये सांगली जिल्हा परिषदेतूनही विधानसभा, विधान परिषदेत गेलेले सदस्य आहेत.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या पाच सदस्यांनी पुढे विधानसभेतही कारकीर्द घडवली आहे. जिल्हा परिषदेचे १९६२ ते ६७ या काळात पहिले अध्यक्ष बनलेले कवठेमहांकाळचे बी. एस. कोरे पुढे कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते, तर १९८० ते ८५ या कालावधीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असणारे खानापूरचे संपतराव माने आधी १९६२ आणि नंतर १९८५ मध्ये ते खानापूर मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले. तासगावचे धोंडिराम पाटील हे १९६२ मध्येच आमदार झाले होते.

Sangli ZP : भाजपला रोखण्यासाठी पुन्हा चक्रव्यूह; जिल्हा परिषद रणधुमाळीला सुरुवात

जिल्हा परिषदेचे १९८५ ते ९५ असा दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले शिराळ्याचे शिवाजीराव नाईक हेही पुढे याच मतदारसंघातून आमदार झाले. त्यांनी चार वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. पहिल्या टर्ममध्ये १९९५ मध्ये ते अपक्ष आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांना राज्यमंत्री म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली, तर अशीच आमदारकी भूषवण्याची संधी मिळालेले चौथे अध्यक्ष म्हणजे कडेगाव तालुक्यातील सोनसळचे मोहनराव कदम.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम यांनी २०१६ मध्ये सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विजय मिळवून ते विधान परिषदेचे सदस्य बनले. शिराळ्याचे नामांकित नेते म्हणजे शिवाजीराव देशमुख. १९६७ मध्ये तत्कालीन बिळाशी मतदारसंघातून शिवाजीराव देशमुख हे जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून गेले होते.

त्यानंतर १९७८ मध्ये ते प्रथम विधानसभेवर निवडून गेले. ते चार वेळा विधानसभेत सदस्य होते. त्यानंतर दोन वेळा विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात गृह, कृषी, ऊर्जा, अन्न व नागरी पुरवठा आदी खाती सांभाळली होती. शिराळ्याचे भगवानराव पाटील १९६७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर १९७२ मध्ये ते शिराळा मतदारसंघातून आमदार झाले होते.

राज्यात आपल्या वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने ठसा उमटवलेले आर. आर. आबा पाटील यांनीही जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात केली. ते तासगाव तालुक्यातील सावळज जिल्हा परिषद मतदार संघातून ते सदस्य म्हणून ‘मिनी मंत्रालया’त गेले. त्यानंतर त्यांनी १९९० पासून सलग सहा वेळा तासगाव मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले.

त्यापैकी २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघाचे नेतृत्व केले. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदासह ग्रामविकासमंत्री, गृहमंत्री अशी मंत्रिपदे भूषवून आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला.

तासगाव तालुक्यातील आणखी एक नेते माजी खासदार संजय पाटील हे चिंचणी जिल्हा परिषद मतदार संघातून १९९७ मध्ये सदस्य झाले. त्यानंतर २००८ मध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडले गेले, तर २०१४ आणि २०१९ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले होते. जिल्हा परिषदेच्या पहिल्या टर्ममध्ये समाजकल्याण विभागाचे सभापती असलेले जतचे शिवरुद्र तथा एस. टी. बामणे १९६७ आणि १९७२ च्या निवडणुकीत जत विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.

पूर्वाश्रमीच्या खानापूर तालुक्यातील कडेगाव येथील संपतराव देशमुख यांनी खानापूर पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही कार्य केले. त्यानंतर १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भिलवडी-वांगी मतदार संघातून ते अपक्ष निवडून आले होते. जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती राहिलेले खानापूरचे ज्येष्ठ नेते अनिल बाबर यांनी तीन वेळा विधानसभा गाजवली.

कुंडल जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आणि बांधकाम सभापती झालेले संपतराव चव्हाण हे १९७८ नंतर सलग दोन वेळा तत्कालीन भिलवडी-वांगी मतदार संघाचे आमदार झाले होते. जतचे विक्रम सावंत हे जिल्हा परिषद सदस्य असताना २०१९ मध्ये ते विधानसभेत निवडून आमदार झाले होते. पंचायत समिती ते विधानसभा

पंचायत समितीचे सभापतिपद भूषवलेले म्हैसाळचे मोहनराव शिंदे आणि सलगरेचे विठ्ठलदाजी पाटील यांनी पुढे जाऊन विधानसभा निवडणूक ही लढवली आणि आमदार झाले. मोहनराव शिंदे १९७८ मध्ये आमदार झाले होते, तर विठ्ठलदाजी १९७८ पासून तीन वेळा आमदार होते.

कवठेमहांकाळ मतदार संघातून अजितराव घोरपडे हे सुद्धा १९९५ पासून तीन वेळा आमदार होते. शिवाय काही काळ ते राज्य मंत्रिमंडळात होते, तर तासगाव पंचायत समितीचे सभापती राहिलेले ज्येष्ठ नेते दिनकर आबा पाटील यांनी पुढे जाऊन तासगाव मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले.

उपाध्यक्षपद ते आमदार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवून पुढे आमदार बनलेले चार सदस्य आहेत. यात आष्ट्याचे विलासराव शिंदे, जतचे विलासराव जगताप, शिराळ्याचे सत्यजित देशमुख आणि विट्याचे सुहास बाबर यांचा समावेश आहे.

वाळवा तालुक्यातील वजनदार नेते म्हणून ओळख असलेले विलासराव शिंदे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले होते. पुढे, १९७८ मध्ये वाळवा मतदार संघातून ते विधानसभेत आमदार म्हणून गेले, तर विलासराव जगताप २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले होते. सत्यजित देशमुख आणि सुहास बाबर हे विद्यमान आमदार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.