एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिवसेनेतील मोठ्या नेत्याची दांडी, नाराजीची चर्चा
Tv9 Marathi February 04, 2026 09:45 PM

धाराशिव जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांची नाराजी चर्चेचा विषय असते. आता माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला दांडी मारली. जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना आमदार तानाजी सावंत मात्र गैरहजर होते. मंत्रिमंडळात डावलल्यापासून आमदार तानाजी सावंत पक्षाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कायम गैरहजर दिसतात. विधानसभा निवडणुकीपासून तानाजी सावंत यांचे फक्त मतदारसंघावर लक्ष आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदारसंघाबाहेर विजय संकल्प मेळावा केला. मात्र त्यानंतर ते फारसे सक्रिय नाहीत. भूम, परंडा, वाशी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुक प्रचारात तानाजी सावंत दिसतात. नगरपरिषदेपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीत तानाजी सावंत यांची मतदारसंघात मित्र पक्षांसोबत युती नाही. पक्षाच्या कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली आहे. तानाजी सावंत यांच्या मनात नेमकं काय ? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

‘माझा नाद करायचा नाही’

धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेतील तानाजी सावंत यांचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं आहे. ‘थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो’ अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला दम दिला. तानाजी सावंत यांनी थेट विरोधी उमेदवारावर टीका केली. सभा स्थळी येताना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून संताप व्यक्त केला, जनतेला वेठीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला. आपलाच जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने तानाजी सावंत आक्रमक झालेत. ‘माझा नाद करायचा नाही’, असं म्हणत त्यांनी बंडखोर उमेदवारावर निशाणा साधला.

मी मी म्हणणाऱ्यांची मी जिरवली आहे

“आज रस्त्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. मी रस्त्यावरून आलो. तो रस्ता विरोधक आपणच केल्याचा दावा करत आहेत. तुझ्या बापानं निधी आणला का? महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे, निधी मी आणला. थांब आता तुझी चौकशीच लावतो. माझा नाद करायचा नाही. मी मी म्हणणाऱ्यांची मी जिरवली आहे” असा इशारा आमदार तानाजी सावंत यांनी दिला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.