Eknath Shinde : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार : एकनाथ शिंदे
esakal February 05, 2026 05:45 AM

जेवळी : सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार अन्नदात्या शेतकऱ्यांचा असून, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही घेणारे नाही, तर देणारे आहोत. महायुतीच्या वचनाम्यातील आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आली असून, समितीचा अहवाल येताच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा देणार आहोत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जेवळी (ता. लोहारा) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त उमरगा व लोहारा तालुक्यातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. ४) जेवळी येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्कप्रमुख राजेंद्र साळवी, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे सुरू आहे. राज्यातही महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव विकास साधला जात आहे. सरकारने अनेक प्रकल्पांना चालना दिली असून, मोठ्या प्रमाणात लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. महिलांसाठी धाडसाने राबवण्यात येत असलेली 'लाडकी बहीण' योजना, लखपती दीदी योजना, एसटी तिकीट दरात सवलत आणि मुलींना मोफत उच्च शिक्षण यांसारख्या योजनांमुळे महिलांना मोठा आधार मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana update : लाडक्या बहिणींना १५०० नाही २१०० देणार, योजना सुरू केलेल्या एकनाथ शिंदेंचे वक्तव्य

त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी मोफत उपचार, शेतकरी सन्मान योजना आणि पीकविमा योजनेच्या माध्यमातून बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. हे डबल इंजिनचे सरकार असून राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत आहेत. पुढील काळात ५० लाख बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा सरकारचा संकल्प आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक आपल्या गावचा, जिल्ह्याचा विकास आणि तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याची निवडणूक असून विकासाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी नगराध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख सुनील साळुंखे व उमरगा व लोहारा तालुक्यातील महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.