पोलीस मैदानात रंगला कारागृह कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांचा मेळा
esakal February 05, 2026 05:45 AM

पोलिस मैदानात रंगला कारागृह कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांचा मेळा

ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) : पोलिस मैदानात आयोजित करण्यात आलेल्या कारागृह क्रीडा स्पर्धांचे उद्घघाटन पोलिस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. या तीनदिवशीय स्पर्धेत मुंबई, तळोजा, ठाणे या मध्यवर्ती आणि इतर जिल्हा व विशेष कारागृहातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
कारागृह कर्मचारी अत्यंत तणावपूर्ण व कठीण स्वरूपाचे काम करीत असतात. गुन्हेगारांची मानसिक हाताळणी करणे, क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांमुळे निर्माण होणारा ताण व दमछाक याचा कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम होत असतो. अशा परिस्थितीतदेखील विविध खेळांमध्ये ते चांगली कामगिरी करीत आहेत, हे नक्कीच कौतुकास्पद असल्याचे मत सहआयुक्त चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केले. या वार्षिक क्रीडा स्पर्धा ३ फेब्रुवारीला सुरू झाल्या असून, ५ फेब्रुवारीला त्यांची सांगता होईल. या तीनदिवसीय क्रीडा स्पर्धांमध्ये मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, तळोजा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, रत्नागिरी विशेष कारागृह, अलिबाग जिल्हा कारागृह आणि सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहातील २५३ कर्मचारी खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. कर्मचाऱ्यांमधील खेळांना वाव देणाऱ्या या स्पर्धांमध्ये वैयक्तिक, सांघिक अशा विविध खेळांचा समावेश असून, १००, २००, ४००, ८०० व १,५०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, कुस्ती, कराटे, बॅडमिंटन, बास्केटबॉल तसेच व्हॉलीबॉल, कबड्डी, रस्सीखेच इत्यादी खेळ खेळविण्यात येत आहेत. अपर पोलिस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडत असल्याचे ठाणे मध्यवर्ती कारागृह महानिरीक्षक राणी भोसले यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. चव्हाण यांनी कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. कामाचा ताण असतानाही कर्मचारी खेळापासून दूर गेले असल्याने हा गुण त्यांना शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी दक्षिण विभागातील सर्व कारागृह अधीक्षक आपल्या संघासह उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षद अहिरराव यांनी केले. अधीक्षक राणी भोसले यांनी आभारप्रदर्शन आणि सूत्रसंचालन तुरुंगाधिकारी अमृता दशवंत यांनी केले.

फोटोओळ - सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी कारागृह क्रीडा स्पर्धेची मशाल प्रज्वलित केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.