आळेफाटा, ता. ४ ः सर्व उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आळेफाटा येथील पोलिस ठाणे हद्दीतील राजुरी- बेल्हे, आळे - पिंपळवंडी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील गावे येत असून येथील जिल्हा परिषदेचे उमेदवार व पंचायत समितीचे उमेदवार यांची बैठक पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती, तेव्हा ते बोलत होते.
यावेळी पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले, ७ तारखेला मतदान होत असून ९ला मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. या अनुषंगाने सर्वांनी आदर्श आचारसंहिता पालन करणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवारांनी प्रचार करताना विकासात्मक मुद्दे, सार्वजनिक हिताचे विषय, कायदेशीर चौकटीतील धोरणे व कार्यक्रम याबाबतच भाष्य करावे तसेच धर्म, जात ,पंथ, समाज, भाषा, महिला, अपंग, अल्पसंख्याक यांच्याबाबत द्वेष, तेढ, वैरभाव निर्माण होईल असे वक्तव्य कोणत्याही उमेदवाराची किंवा व्यक्तीची वैयक्तिक बदनामी खोटे आरोप किंवा अपमानास्पद भाषा भडक, चिथावणीखोर, हिंसाचारक, प्रवृत्त करणे, मतदारांना धमकावणारी दबाव टाकणारी किंवा भीती निर्माण करणारी भाषा वापरणे खोटी माहिती अफवा बनावट किंवा एडिट केलेले फोटो व्हिडिओ, ऑडिओ प्रसारित करणे अथवा बोलणे अथवा प्रसारित करणे यावर सक्त मनाई असल्याचे सांगितले.
मतदानाच्या दिवशी शांतता राखणे बंधनकारक असून १०० मीटरच्या बाहेर कोणालाही मंडप टाकण्यास परवानगी देणार येणार नाही. फक्त एक छत्री, एक टेबल, दोन खुर्च्या यांना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार परवानगी देण्यात येईल व मतमोजणीनंतर आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही ठिकाणी विजयी मिरवणूक तसेच गुलाल उधळू नये व पराभूत उमेदवाराच्या घराजवळ अथवा समोर जाऊन विजयी जल्लोष घोषणाबाजी वैयक्तिक टीका करू नये, कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. मतदान अधिकारी कर्मचारी व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.