कडूस, ता. ४ ः ‘‘संत आणि देवाच्या मार्गाने जा. संतांच्या मागे गेलात तर चांगले विचार व आचरणाने जीवन समृद्ध होईल आणि देवाच्या मागे गेलात तर जीवनाचे सार्थक होईल. संत तेथे देव अन देव तेथे संत, याप्रमाणे आपल्याला देव तर होता येणार नाही. परंतु संतांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी ईश्वराची भक्ती आहे,’’ असे मार्गदर्शन अनंत महाराज काळे यांनी प्रतिपंढरपूर श्रीक्षेत्र कडूस (ता. खेड) येथे श्री पांडुरंग उत्सवातील हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनात केले.
प्रतिपंढरपूर श्रीक्षेत्र कडूस येथे माघ शु. दशमी ते माघ शु. पौर्णिमा या कालावधीत श्रीपांडुरंग उत्सव पार पडला. या कालावधीत पंढरपूरचा पांडुरंग पाच दिवस गावात वास्तव्यास येत असल्याने ग्रामस्थ व मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते.
उत्सवाचे यंदाचे ३८०वे वर्ष आहे. या उत्सवाची सांगता मंगळवारी (ता. ३) भक्तिमय वातावरणात झाली. मुख्य मंदिरात विकासबुवा दिग्रजकर यांचे पाऊलघडीचे कीर्तन झाले. यावेळी देवाच्या चरणापासून मंदिराच्या बाहेरपर्यंत सुती वस्त्रावर श्रींच्या गमन प्रसंगी पाऊलखुणा उमटत असल्याने गावातील पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर पांडुरंगाने पुन्हा पंढरपूरकडे प्रयाण केल्याचे भाविक मानतात. आरतीनंतर देवस्थान ट्रस्टच्या उत्सव कार्यक्रमांची सांगता झाली, तर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताहाची सांगता मंदिरासमोरील धर्मशाळेत दुपारी बारा वाजता स्वरभास्कर अनंत महाराज काळे (संगमनेर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. त्यानंतर मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट, सरपंच हेमलता खळदकर, उपसरपंच अरुण शिंदे, अशोक बंदावणे, भानुदास बंदावणे, अभिनाथ शेंडे, अशोक गारगोटे, संतोष ढमाले, शंकर कावडे, चांगदेव ढमाले, निवृत्ती नेहेरे, आनंदराव पानमंद आदी उपस्थित होते. हरिनाम सप्ताहाच्या नियोजनासाठी अध्यक्ष बाळासाहेब ढमाले, दामुशेठ बंदावणे, माऊली तुपे, राजेंद्र ढमाले, आप्पा खंडागळे, आप्पा धायबर, शांताराम अभंग, बाजीराव ढमाले, नवनाथ गारगोटे, सुदाम महाराज मुसळे, पोपट धायबर, सदाशिव चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. भाविकांसाठी अन्नप्रसादाची सोय करण्यात आली होती.