कूपर रुग्णालयात १४५ पदांची भरती, पण नेमणुका तात्पुरत्याच
डॉक्टर, तंत्रज्ञांच्या कमतरतेवर महापालिकेची संविदा भरती; कायमस्वरूपी उपाय अजूनही दूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : जुहू येथील कूपर रुग्णालयात अनेक वर्षांपासून डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी मोठी भरती मोहीम सुरू केली आहे. मात्र या भरतीतून होणाऱ्या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या आणि संविदा पद्धतीनेच असणार आहेत.
या भरती मोहिमेत एकूण ३९ विभागांमधील १४५ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये डॉक्टर, सहाय्यक डॉक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, एक्स-रे सहाय्यक, अर्धवेळ नेत्रतपासणी कर्मचारी, आया, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ही भरती रुग्णालयाला तात्पुरता दिलासा देणारी असली, तरी कायमस्वरूपी कर्मचारी भरती न झाल्यास कूपर रुग्णालयातील अडचणी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कूपर रुग्णालयात सध्या कायमस्वरूपी कर्मचारी कमी असून, मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. याबाबत सप्टेंबर २०२५मध्ये रुग्णालयातील डॉक्टरांनी तत्कालीन अधिष्ठात्यांना पत्र लिहून कर्मचारी टंचाई गंभीर असल्याचे सांगितले होते. डॉक्टरांच्या मते, अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांना वेळेवर आणि योग्य सेवा देणे कठीण होत आहे.
या संविदा कर्मचाऱ्यांना ठरावीक मानधन दिले जाणार आहे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता किंवा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर फायदे मिळणार नाहीत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
८९ दिवसांसाठीच नेमणूक
महापालिकेच्या मंजुरीनुसार, या भरती मोहिमेतून नेमले जाणारे कर्मचारी ३१ मार्च २०२७ पर्यंत काम करू शकणार आहेत. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता तपासल्यानंतर मुलाखत घेतली जाणार असून, त्यानंतर निवड केली जाणार आहे. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याची नेमणूक एका वेळी जास्तीत जास्त ८९ दिवसांसाठीच असेल. काम चांगले असल्यास ही मुदत पुढे वाढवली जाऊ शकते.