ओम बिर्ला म्हणाले, पंतप्रधानांसोबत काहीही घडलं असतं म्हणून सदनात येऊ नका म्हटलं; आता वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकरांचा पलटवार, आम्ही बॅनर घेऊन उभे होतो, आमच्याकडे मारायला हत्यार होतं का?
जयदीप मेढे February 05, 2026 08:13 PM

Varsha Gaikwad and Pratibha Dhanorkar on Om Birla: संसदीय लोकशाहीमध्ये आमचा पूर्ण विश्वास आहे. माझ्या आयुष्यातील अर्धे आयुष्य संसदीय लोकशाहीमध्ये गेलं आहे.  मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी आहे. आम्ही देशाच्या संविधानामध्ये संसदेमध्ये पूर्ण विश्वास ठेवतो त्याचा पूर्ण आदर ठेवतो. लोकसभा अध्यक्षांनी निष्पक्षपणे काम करावं, आम्हाला न्याय द्यावा. विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांना बोलायला द्यायचं नाही आणि सत्ताधारी पक्षामधील अश्लील बोलतील तर त्यांना बोलायला द्यायचं ही भूमिका बरोबर नाही, अशा शब्दात खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांसोबत काहीही घडलं असतं, अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर महिला खासदारांनी जोरदार पलटवार केला. 

अध्यक्षांच्या पक्षपातीपणावर टीका

दरम्यान, खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, अध्यक्ष हे जबाबदार खुर्चीवर बसले असताना मग असा दुजाभाव कसा करु शकतात? अध्यक्ष फक्त एका बाजूचं ऐकून घेतात, दुसऱ्या बाजूचं अजिबात ऐकून घेत नाही. जबाबदार खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी सगळ्यांना समानतेचा न्याय हा दिला पाहिजे. जेव्हा जेव्हा वायफळ वक्तव्य करण्यासाठी निशिकांत दुबे उभे होतात तेव्हा त्यांचा माईक ठिकाणी सुरू होतो. खरं तर हे चुकीचं असल्याचे त्या म्हणाल्या. अख्ख्या सभागृहाला माहित होतं की पंतप्रधान जागेवर येणारच नाहीत. पंतप्रधान जर का त्या चेअरवरती बसून असते आणि महिला खासदार गेले असते तर आम्ही मान्य केलं असतं, असे त्या म्हणाल्या. 

निशिकांत दुबेला पंतप्रधानांचा सपोर्ट होता का? 

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, निशिकांत दुबेला पंतप्रधानांचा सपोर्ट होता का? त्यांच्या वक्तव्याला अमित शाहांचा सपोर्ट होता का? अध्यक्षांचा समर्थन होतं का? अशी विचारणा केली. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी आणि सोनिया गांधीजींबद्दल अश्लील बोललं जातंय. किती विष त्याच्या (निशिकांत दुबे) मनात आहे आणि किती खोटं बोलायचं भाजपने आणि किती खोटे नरेटिव्ह तयार करायचे याला पण काहीतरी सीमा ठेवा, अशा शब्दात त्यांनी फटकारले. एखादी व्यक्ती अन्याय करत असेल तर तो अन्याय सहन करणं सुद्धा महापाप आहे, हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं असल्याचे त्या म्हणाल्या. 

'बांगड्या' आणि 'शारीरिक हल्ला' आरोपांचे खंडन

त्या म्हणाल्या की, आम्ही फक्त एक बॅनर घेऊन गेलो होतो. आता तुम्ही म्हणाल बांगड्या घालून का गेलात? तर बांगड्या काढू शकत नव्हतो, आम्हाला माहित नव्हतं की आमच्या बांगड्यांचा पण एवढा विषय पुढे होऊन जाईल. बांगड्यांचा अर्थ असा होत नाही की कोणाला मारायसाठी घालतात. त्या सौभाग्याचं लेणं म्हणून घालतात. शारीरिक हल्ला कसा होणार? 25 वर्षाच्या राजकारणामध्ये किती लोकांना शारीरिक हल्ला केला? कोणाला कधी हात लावलाय, कोणाला कधी मारलंय? आमची ती परंपरा नसल्याचे त्या म्हणाल्या. या विषयाला एक वेगळी दिशा देण्याचं काम चाललेलं आहे. पंतप्रधान आलेच नाहीत. बॅनरला तुम्ही घाबरलात का? राहुलजी जे पुस्तक देणार होते त्याला घाबरले का? म्हणूनच ते आले नाहीत का? याचे संशोधन पत्रकारांनी केलं पाहिजे, असे त्या म्हणाल्या.  आम्ही लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करू शकतो. आम्ही बॅनर घेऊन उभे होतो, आमच्याकडे काय मारायला हत्यार होतं का?आम्ही रोज त्या 'वेल'मध्ये जातो, तिथे समोरच विरोधी पक्षनेत्यांची आणि पंतप्रधानांची बेंच आहे. मग आम्ही तिथे जाऊ शकत नाही का? खोटं बोलायचं पण रेटून बोलायला भाजप आहे. त्यांनी नरेटिव्ह सेट केलं की महिला मारायला आल्या, असा पलटवार त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.