Nashik : महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आता कोणत्या पक्षाचा महापौर होणार याची चर्चा सर्वच महानगरपालिकांमध्ये आहे. कारण अनेक ठिकाणी कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळं एकत्र येऊनच महापौर निवडणुकीची गणित जुळवावी लागणार आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात देखील वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिंदेच्या सेनेसोबत गेली आहे. शिंदेसेना आणि भाजप यांची नाशिकमध्ये युतीचे घोगडे भिजत पडलेलं असताना शिंदेची शिवसेना आणि मनसेच्या आघाडीच नव समीकरण समोर आलं आहे.
शिवसेना मनसे आघाडी असं नवीन नामकरण समोर आलं आहे. मनसेच्या मयुरी पवार एकमेव नगरसेविका विजयी झाल्या आहेत तर शिवसेनेचे 26 नगरसेवक विजयी ढझाले आहेत. मनसेला सोबत घेतल्याने शिंदेसेना आणि मनसे यांचा मिळून एक सदस्य स्थायी समितीवर वाढणार आहे.
नाशिक महानगरपालिकेत मनसेचा एकमेव नगरसेवक आता शिंदे सेने सोबत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढलेले मनसेचे एकमेव नगरसेवक सत्ता स्थापनेपूर्वी शिंदे सोबत गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. स्थायी समिती, प्रभाग समिती, स्विकृत नगरसेवक आणि पालिकेतील वेगवेगळ्या समितीवर राजकीय समीकरण बदलणार आहेत.