अजितदादांच्या कार्यकर्त्यांना साथ द्या
esakal February 06, 2026 06:45 AM

बारामती, ता. ५ : ‘‘निवडणूक प्रचारासाठी निघाले असताना घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना दिवंगत अजितदादांच्या विचारांना खरी आदरांजली वाहायची असेल, तर नागरिकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशीर्वाद व सहकार्य द्यावे. अजितदादा ज्या विचारधारेसाठी कार्यरत होते, तो विचार पुढे नेण्यासाठी समाजाने एकत्र यावे. ज्या-ज्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते निवडणुकीत उभे आहेत, त्यांना पाठिंबा देणे, हीच राजकीय दृष्टिकोनातून खरी आदरांजली ठरेल,’’ असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
बारामतीत विद्या प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अजितदादांचे भव्य स्मारक उभारण्याची सर्वांची इच्छा असून, त्यासाठी प्राथमिक पाहणी केली. बारामती शहरात किंवा अन्य योग्य ठिकाणी दादांचे संग्रहालय उभारण्याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाणार आहे.’’

पवारसाहेब हे नेहमीच कुटुंबाचे केंद्रबिंदू राहिले असून, अडचणीच्या काळात त्यांनी परिवाराला आधार दिला आहे. दादा नसतानाही त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. वैयक्तिक व सामाजिक विषयांमध्ये त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.
- रोहित पवार, आमदार

आमदार रोहित पवार म्हणाले...
- विमानातील घटनेबाबत संपूर्ण माहिती जनतेसमोर यावी. काही अनुत्तरित प्रश्न आहेत. यासंदर्भात केंद्र सरकार व संबंधित विमान कंपनीकडे स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे.
- राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्राकाकी कायम राहाव्यात, अशी सर्वांची इच्छा आहे. आमदार, पदाधिकारी, परिवार व जनतेच्या भावना विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल.
- गेल्या काही दिवसांत परिवारात राजकीय चर्चा झालेली नाही. कुटुंबातील राजकीय दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सध्या सुरू असलेल्या चर्चांना राजकीय स्वरूप दिले जात आहे.
- घरच्यांची परवानगी मिळाली तर 9 तारखेनंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कौटुंबिक व राजकीय देखील सविस्तर भूमिका मांडणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.