IMD Weather Update : तिहेरी संकट, हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्राबाबतही मोठी बातमी
Tv9 Marathi February 06, 2026 06:45 AM

पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच बर्फवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस उत्तर -पश्चिम भारतामध्ये 20 ते 30 किलोमीटर प्रती तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार 6 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये दाट धुकं पडणार आहे, तर हिमाचल प्रदेशमध्ये 7 फेब्रुवारी रोजी धुकं पडणार असून, त्यामुळे दृष्टमानता कमी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कुठे कुठे पावसाचा इशारा?

भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन पश्चिमी विक्षोभ सक्रिय असल्यामुळे जम्मू -काश्मीरमध्ये पावसासोबतच मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर त्यानंतर पुन्हा एकदा 9 फेब्रुवारीपासून ते 11 फेब्रुवारीपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये पवासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याकाळात जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये देखील 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी वारा, पाऊस, आणि बर्फवृष्टी असं तिहेरी संकट असणार आहे.

महाराष्ट्रात तापमान कसं राहणार?

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र तापमानात घट झाल्यामुळे काही भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. तर मुंबई आणि समुद्र किनारी भागात मात्र उकाडा वाढणार असून, उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे. मुंबई प्रमाणेच कोकण आणि मराठवाड्यात देखील तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होणार असून, उन्हाचा कडका वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील पुढील दोन दिवस हवामान कोरडं राहणार असून, तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या इतर भागांमध्ये थंडीचा जोर आणखी काही दिवस कायम राहू शकतो, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून उन्हाचा कडका वाढण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.