बीड - कारमधील इंजिन व इतर यंत्रणा गरम झाल्याने वायरचे शॉर्टसर्किट होऊन कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखविले आणि पोलिसांनीही सतर्कता दाखविल्याने अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी (ता. तीन) रात्री उशिरा मांजरसुंबा घाटात घडली. कारमधून चौघे प्रवास करत होते.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा घाटातून गंगाखेडकडे जाणाऱ्या कारला (एमएच-२२, एएम-५२०३) शॉर्टसर्किटने रात्रीच्या वेळी आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने अनेकांचा थरकाप उडाला.
याचवेळी महामार्ग वाहतूक पोलिसांनी कारमधील हितेश खंडागळे, त्यांची पत्नी व दोन मुलांना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने कार विझविण्यात आली. नंतर ही कार रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
फिटनेस २०३४ पर्यंत; पण इन्शुरन्स संपलेला
दरम्यान, या कारची नोंदणी नोव्हेंबर २०२९ मध्ये परभणी जिल्ह्यात झालेली असून, या कारचा फिटनेस २०३४ पर्यंतचा आहे. मात्र, मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच या कारचा इन्शुरन्स संपला आहे. कारची पीयूसी २०२६ पर्यंतची असल्याची माहिती समोर आली.