कळंबटमधील बीएसएनएल टॉवर नादुरुस्त
प्रशासनाची डोळेझाक; चार महिने ग्रामस्थांना प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ५ ः तालुक्यातील कळंबट येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सतत नादुरुस्त असून, या परिसरातील ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. कळंबटसह म्हैसोंडे, वाघवे, अडखळ, ताडील, कोंगळे आदी गावांतील अनेक नागरिकांचे मोबाईल संपर्क पूर्णपणे या टॉवरवर अवलंबून आहेत. टॉवर बंद अवस्थेत असल्यामुळे संपूर्ण परिसरातील दूरध्वनी व्यवस्था अक्षरशः कोलमडली आहे.
मोबाईल सेवा ठप्प असल्याने नागरिकांना आर्थिक व्यवहार, आरोग्यविषयक संपर्क, शैक्षणिक कामकाज तसेच शासकीय कार्यालयांशी संपर्क साधताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधणेही अशक्य झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात बीएसएनएलच्या दापोली व रत्नागिरी विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधित अधिकारी आणि कर्मचारी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांची उदासीन भूमिका पाहता बीएसएनएलबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, म्हैसोंडे सामाजिक कार्यकर्ते दीपक गुरव व जितेश शिर्के यांनी दापोली बीएसएनएल अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधला असता त्यांनी ‘ते काम माझे नाही,’ असे उडवाउडवीचे उत्तर दिले. बीएसएनएल प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास ग्रामस्थ लवकरच तीव्र जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.