आरोग्य सुविधांना घरघर
esakal February 06, 2026 02:45 PM

आरोग्य सुविधांना घरघर
जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्र्यांची कबुली
पालघर, ता. ५ ः जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, महिला व बाल रुग्णालय, आदिवासी भागांसाठी अत्यावश्यक जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा रुग्णालयाचे बळकटीकरण होणार होते, पण जिल्हा स्थापन होऊन दशक लोटले तरी परिस्थिती बदलली नसल्याची कबुली जिल्हा नियोजन समितीत खुद्द पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पालघर जिल्ह्याला स्वतंत्र आणि सुसज्ज जिल्हा रुग्णालय उपलब्ध नाही. गंभीर आजार, प्रसूती, अपघात, तातडीच्या उपचारांसाठी रुग्णांना गुजरात, ठाणे किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागते. वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेकदा रुग्णांच्या जीवावर बेतत आहेत. वेळ, पैसा, अंतरामुळे अनेकांचे जीव जात असताना प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचा मोठा भाग ग्रामीण आणि आदिवासी असल्याने येथे सरकारी आरोग्य यंत्रणाच एकमेव आधार आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये पुरेसे मुष्यबळ नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा महागडा पर्याय स्वीकारावा लागत असल्याने आजार अंगावर काढण्याची मानसिकता वाढली आहे.
---------------------------
रखडलेले प्रमुख प्रकल्प
- जिल्हा रुग्णालयाची इमारत उभी असताना रुग्णालय पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होण्यासाठी अजूनही १८८ कोटींच्या जवळपासच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानंतरच रुग्णालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, निधीचा प्रस्ताव अजूनही लालफितीत आहे.
- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गलगत उभारलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची अवस्था जिल्हा रुग्णालायसारखी होऊन बसली आहे. इमारत पूर्ण आहे मात्र अजूनही निधी लागणार असल्याने निधीअभावी हे सेंटर खितपत पडले आहे.
- जिल्ह्यातील महिला आणि बालकांसाठी स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय उभारण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली. मात्र, हे रुग्णालय अजूनही अस्तित्वात आलेले नाही. ग्रामीण भागातील गरोदर माता, नवजात बालके आणि लहान मुलांना आवश्यक तज्ज्ञ उपचार मिळत नाहीत.
-----------------------------
इतर जिल्ह्यात उपचारांची नामुष्की
आदिवासीबहुल जव्हार, मोखाडा तालुक्यातील रुग्णालयाची स्थिती तर अधिकच चिंताजनक आहे. डॉक्टरांची कमतरता, अपुरी साधनसामग्री, औषधांचा तुटवडा, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे केवळ नावापुरतीच उरली आहेत. पावसाळ्यात दुर्गम भागातील रस्ते खराब झाल्याने रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण जाते. त्यातच रुग्णालयात रुग्ण, गरोदर माता उपचारासाठी दाखल केल्यानंतर काहीना नाशिक येथे हलविण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आरोगय सुविधांअभावी रुग्णांना इतर जिल्ह्यात नेण्याची नामुष्की ओढवते.
-----------------------------------
पालघर जिल्ह्यात तातडीने जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर, महिला व बाल रुग्णालय तसेच ग्रामीण दुर्गम भागात सुसज्ज आरोग्य सुविधा उभारणे ही काळाची गरज आहे. अन्यथा आरोग्य हक्क हा केवळ कागदावर राहील. या विषयावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला हवा.
- सुनील भुसारा, माजी आमदार
---------------------------
जिल्ह्यातील आरोग्य सुविधा कमी असल्याचे तथ्य आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुदृढ व्हाव्यात यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून जनसामन्यांच्या उपेक्षा थांबवू, असा विश्वास आहे.
- गणेश नाईक, पालकमंत्री, पालघर जिल्हा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.