कळमनुरी - बाजारपेठेत सोयाबीनच्या भावामध्ये मोठी वाढ झाली, मात्र आवक मंदावली आहे. नवीन येणाऱ्या तुरीच्या भावामध्ये मात्र तेजी असून नवीन तुरीला आठ हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विक्रीला प्राधान्य दिले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढली असताना सोयाबीनच्या डीओसी ढेपीला मोठी मागणी आली आहे. सोयाबीनच्या ढेपीमध्येही मोठी भाववाढ झाल्यामुळे सोयाबीनला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत सोयाबीन उपलब्ध होत नसल्यामुळे दरामध्ये दररोज नियमितपणे काही प्रमाणात भाववाढ होत असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. सोयाबीनचे भाव आज पाच हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल आहेत.
सोयाबीनच्या दरात वाढ होत असतानाच बाजारपेठेत आवकही घटली आहे. काही शेतकऱ्यांनी सुरवातीलाच सोयाबीनची विक्री केली, त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांनी सुरवातीला शेतकऱ्यांकडून कमी किमतीत खरेदी केलेले सोयाबीन साठवून ठेवलेले आहे, त्यांनी मागील वर्षी खरेदी केलेले सोयाबीन आता भावात तेजी येताच विक्रीला काढले आहे.
बाजारपेठेत आता या हंगामातील तूर येणे सुरू झाले आहे. तुरीला यावर्षी चांगला भाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातही आठ दिवसांपूर्वी ८ हजार ९०० रुपये खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे भाव आता आठ हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल असे स्थिरावले आहेत.
सोयाबीन पावणेसहा, तर तूर आठ हजारांवर
मागील १५ ते २० दिवसांपासून सोयाबीनच्या भावामध्ये दररोज नियमितपणे वाढ होत आहे; मात्र सोयाबीन काढणीनंतर बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची चार हजार दोनशे ते चार हजार सातशे या भावाने विक्री केली. पण सद्यःस्थितीत सोयाबीन पाच हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल आहे.
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना आता सोयाबीनच्या भाववाढीचा लाभ मिळणार आहे. ज्या व्यापाऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे, त्यांनी आता साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढण्यास सुरवात केली आहे. नवीन तुरीलाही आठ हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.
सोयाबीनच्या भावात तेजी आली असताना सोयाबीनची आवक मात्र मंदावली आहे. ज्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे त्यांना अजून सोयाबीनचे भाव वाढतील, अशी अपेक्षा आहे.
- ओमकार नावडे, भुसार व्यापारी, कळमनुरी