नागपुरात महिंद्राचा मोठा प्लांट, विदर्भात सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प; देवाभाऊंची घोषणा, सांगितलं मॅग्नेट हब
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर February 06, 2026 05:13 PM

नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रात मोठी उद्योजकीय गुंतवणूक आणली असून विदर्भालाही गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधीचं मोठं पॅकेज या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपला दावोस दौरा झाल्यानंतर आज मुख्यमंत्र्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत 'ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सवा'चे उदघाटन नागपूरमध्ये करण्यात आले. विदर्भाच्या (Vidarbha) औद्योगिक विकासासाठी गुंतवणूक आणली जात होती. मात्र, ऑटोमोबाईल इंडस्ट्री (Auto) विदर्भात आली नव्हती. त्यासाठी प्रयत्न सुरू होते, असे म्हणत विदर्भात महिंद्रा कंपनीने 15 हजार कोटींची गुंतवणूक करत नागपुरात प्लँट सुरू होणा असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, नदीजोड प्रकल्पही होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला आम्ही धन्यवाद देतो, कारण महिंद्रा आणि महिंद्रा नेक्स्ट जनरेशन ईव्ही आणि इतर वाहन निर्मितीचा इंटिग्रेटेड ऑटोमोबाईल क्षेत्राचा भारतातील सर्वात मोठा अॅडव्हांटेज विदर्भासोबत केला आहे. त्यामध्ये जवळपास 15000 कोटी रुपयांची गुंतवणूक महिंद्रा अँड महिंद्रा करणार आहे, त्याचा प्लांट नागपुरात सुरू केला जाईल. तर सप्लायचा युनिट संभाजीनगरमध्ये स्थापित केला जाईल. ऑटोमोबाईल क्षेत्रात पुणे लीडर होताच, आता नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक हे केंद्र ही विकसित होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, 2028 पासून महिंद्रा अँड महिंद्राच्या नागपुरातील प्लांटमधून उत्पादन सुरू होईल अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक विदर्भात येत असून गेल्या दहा वर्षात विदर्भाचा चेहरा आम्ही बदलून दाखवला आहे. जवळपास वीस वर्ष गडचिरोली आणि विदर्भातील खनिज संपत्ती संदर्भात फक्त भाषण होत होते. मात्र, कृती होत नव्हती. 2014 नंतर मात्र कृती होत असून गडचिरोलीसह अवतीभवतीच्या जिल्ह्यांमध्येही औद्योगिक इकोसिस्टीम तयार होत आहे. गडचिरोली मध्ये ग्रीन स्टील तयार करू, चीन पेक्षाही स्वस्त स्टील गडचिरोली तयार करून दाखवा. काही लोक असे म्हणतात की मी नागपूरकडे जास्त लक्ष घालतो. औद्योगिक विकासासाठी मॅग्नेट्स तयार करावे लागतात त्या आधारावर अवतीभवतीचा विकास होत जातो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 

महाराष्ट्रात आधी फक्त मुंबई आणि ठाणे हे दोनच औद्योगिक मॅग्नेट होते, आता औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही कोकणात रायगड मराठवाड्यात संभाजीनगर आणि विदर्भात नागपूर, अमरावती असे औद्योगिक मॅग्नेट तयार करत आहोत. टाटा एरोस्पेस ही लवकरच सेंटर ऑफ एक्सीलेंस नागपूरमध्ये उभारणार आहे. औद्योगिक विकासासाठी लवकरच नागपुरात आणखी पाच हजार हेक्टर जमीन अधिगृहीत केली जाईल. सोलर मॉड्युल संदर्भातील औद्योगिक इकोसिस्टीम नागपूर आणि आजूबाजूच्या क्षेत्रात विकसित होत आहे. आशियातील सर्वाधिक मोठं एव्हिएशन स्कूल अमरावतीमध्ये निर्माण केलं जात आहे. येणाऱ्या जुलै महिन्यात त्याचे उद्घाटन होईल, त्यामुळे जागतिक पातळीवरील वैमानिक अमरावतीमधून तयार होतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. गडचिरोली मध्ये ही विमानतळाचं काम सुरू असून गडचिरोलीचे एअरपोर्ट "गेटवे टू साउथ इंडिया" अशा स्वरूपात विकसित केले जाईल.

देशातील सर्वात उत्कृष्ट औद्योगिक पॉलिसी महाराष्ट्र ने तयार केली आहे. त्या अंतर्गत औद्योगिक विकास कमी असलेल्या जिल्ह्यांना आम्ही प्राधान्य दिले आहे. दोवोसमधून राज्यासाठी 30 लाख कोटी तर विदर्भासाठी पावणे चार लाख कोटींची गुंतवणूक आम्ही आणली आहे. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक विकासात मागे सुटलेल्या जिल्ह्यांसाठी आहे, अशी माहितीही फडणवीसांनी येथील कार्यक्रमातून दिली. 

सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प विदर्भात

महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदी जोड प्रकल्प आम्ही लवकरच विदर्भात करणार आहोत. भंडारामधील वैनगंगेला पाचशे किलोमीटर लांब बुलढाणामधील नळगंगा नदीशी जोडणार आहोत. त्यासाठी 500 किमीची कृत्रिम नदी तयार केली जाईल. या प्रकल्पाद्वारे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी दिले जाईल. या नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून वर्ध्याच्या पुढे पश्चिम दिशेत पावसाची कमतरता असलेला जो भाग आहे, तिथे सिंचन व्यवस्था या प्रकल्पाच्या माध्यमातून बळकट होईल. या नदी जोड योजनेची सुरुवात आम्ही याच वर्षी करणार आहोत. या माध्यमातून पाण्याची गरज असलेले उद्योगही विदर्भात येऊ शकतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी दिली. 

Sanjay Shirsat: शरद पवारांनी 2022 साली एनडीएमध्ये येण्यासाठी प्रयत्न केला, खातेवाटपाबाबत चर्चाही झाल्या, पण...; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.