तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये वाचले असेल कीस चायनीज मांजामुळे अनेकांचा मृत्यू होतो, तर काहीजण गंभीर जखमी होतात. सतत घडणाऱ्या अशा घटनांमुळे आता उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात चायनीज मांज्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार होणाऱ्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला. चायनीज मांजाची विक्री आणि उपलब्धता रोखण्यासाठी मुख्यमंत्री योगी यांनी पोलीस अधिकाऱ्यांना राज्यभरात सखोल छापे टाकण्याचे निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे अशा विक्रेत्यांवर आता कारवाई होणार आहे.
उत्तर प्रदेशात मांजावर बंदीमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, ‘चायनीज मांजामुळे होणारा कोणताही मृत्यू हा आता खून मानला जाईल आणि त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. कोणत्याही पातळीवर निष्काळजीपणा होणार नाही याची खात्री करण्यासाठी या राज्यव्यापी मोहिमेचा नियमितपणे उच्च पातळीवर आढावा घेतला जाईल.’ यातून हे स्पष्ट होते की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चायनीज मांजामुळे होणाऱ्या सततच्या मृत्यूंबद्दल नाराज आहेत. त्यांनी बंदी असूनही हा मांजा बाजारात कसा पोहोचत आहे आणि ते कोण विकत आहे याची चौकशी करण्याचे आणि कारवाईचे आदेश दिले आहेत.
खुनाचा गुन्हा दाखल होणारमुख्यमंत्री योगी पुढे बोलताना सांगितले की, चायनीज मांजामुळे होणारा कोणताही मृत्यू आता खून मानला जाईल आणि संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे सरकार आता अशा विक्रेत्यांवक कठोर कारवाई करणार असल्याचे समोर आले आहे. बुधवारी लखनौमध्ये एका वैद्यकीय प्रतिनिधीचा चायनीज मांज्यामुळे गळा कापल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आता सरकारने तातडीने पावले उचलली आहेत.
मांजाच्या बेकायदेशीर वापराला चाप बसणारमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले की, आता संपूर्ण राज्यात या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असूनही मांजाची विक्री केली किंवा वापर केला तर असा सहन केला जाणार नाही.’ आदित्यनाथ यांनी पोलिसांना या बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्या संपूर्ण नेटवर्कची ओळख पटवून, त्वरित कारवाई करण्याचे आणि गुन्हेगारांना अटक करून तुरुंगात टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता मांज्याच्या बेकायदेशीर वापराला चाप बसणार आहे.