Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील अबुजमाड जंगलात गेले तीन दिवसांपासून पोलीस आणि माओवादी यांच्यात चकमक सुरु आहे. यामध्ये पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. गडचिरोली विभागीय कमिटी प्रभारी, वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी तसेच सीपीआय माओवादी संघटनेच्या कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी प्रभाकर, रा. कामारेड्डी, तेलंगणा याच्यासह एकूण 7 जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत कंठस्नान घालण्यात यश आले आहे. मारला गेलेल्या माओवादी प्रभाकर याच्यावर एकूण 25 लाखांचे बक्षीस जाहीर होते.
काल रात्री उशिरा पर्यंत 3 माओवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले होते. त्याव्यतिरिक्त आज दिवसभरात सुरू असलेल्या अभियानादरम्यान घटनास्थळावरून आणखी 4 माओवाद्यांचे मृतदेह (02 पुरुष व 2 महिला) हस्तगत करण्यात आले आहेत. मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या अभियानाच्या अखेरीस एकूण 7 माओवाद्यांचे मृतदेह (4 पुरुष व 3 महिला) हस्तगत करण्यात आले असून, त्यासोबतच घटनास्थळावरून 3 AK-47, 1 SLR आणि 1 .303 रायफल अशी एकूण 5 अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. यादरम्यान, या चकमकीमध्ये सी-60 पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी (वय 38वर्षे), शहीद झाले आहे. तर एक जवान जखमी आहे.