अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची बॅट हवी तशी तळपली नाही. पण अंतिम फेरीत इंग्लंडला दणका बसला. वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध 80 चेंडूत 175 धावांची खेळी केली. यात चौकार आणि षटकार मारत 150 धावा केल्या. त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारले. त्याच्या आक्रमक खेळीने इंग्लंडचा संघ पहिल्या डावातच बॅकफूटवर गेला होता. त्याच्या आक्रमक खेळीने भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 411 धावा केल्या आणि विजयासाठी 412 धावांचं आव्हान दिलं. इतकी मोठी धावसंख्या गाठणं काही सोपं नव्हतं. पण असं असूनही वैभव सूर्यवंशी मात्र शर्यतीत हरला. अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिला. इंग्लंडच्ये बेन मायसने त्याला मागे टाकलं. बेन मायसने 45 धावांची खेळी केली आणि अवघ्या पाच धावांनी वैभव सूर्यवंशीचं स्वप्न भंगलं.
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध 175 धावा केल्या. तसेच स्पर्धेत 439 धावा करण्याचा विक्रम केला. त्यामुळे पहिल्या डावात वैभव सूर्यवंशी टॉपला होता. वैभवने या स्पर्धेत एकूण 439 धावा केल्या. वैभवने 62.71 च्या सरासरीने आणि जवळपास 170 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. पण दुसऱ्या डावात बेन मायने 45 धावांची खेळी केली आणि त्याच्या पुढे निघून गेला. बेन मायसने 7 सामन्यात 74 च्या सरासरीने 444 धावा केल्या. मायसने या खेळीत 1 शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली. त्यामुळे वैभव सूर्यवंशीच्या तुलनेत फक्त 5 धावा अधिक करून मोठा मान मिळवला.
वैभव सूर्यवंशी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला नसेल. पण त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 30 षटकार मारले. तसेच त्याचा स्ट्राईक रेटही जबरदस्त राहिला. अंतिम फेरीत सर्वात मोठी खेळी करून विक्रम प्रस्थापित केला. आतापर्यंत यूथ वनडे सामन्याच्या अंतिम फेरीत कोणत्याही खेळाडूने इतकी मोठी खेळी केली नाही. यापूर्वी आशिया कप स्पर्धेत समीर मिन्हासने 172 धावांची खेळी केली होती. आता हा विक्रम वैभव सूर्यवंशीने मोडला.