'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम'च्या घवघवीत यशानंतर निर्मात्यांनी केली सिक्वेलची घोषणा ! झिम्मा ३ ही येणार
esakal February 07, 2026 04:45 AM

Marathi Entertainment News : मराठी माध्यमाच्या शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५ करोडचा महत्त्वाचा टप्पा पार करत आपले यश अधिक भक्कम केले आहे. या भरीव यशानिमित्त चित्रपटाच्या टीमकडून भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार व तांत्रिक टीमसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.

समारंभा दरम्यान या चित्रपटाच्या प्रचंड यशावर आनंद व्यक्त करत निर्माते-दिग्दर्शकांनी टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले. विशेष म्हणजे, याच सोहळ्यात प्रेक्षकांसाठी दोन मोठ्या सरप्राईज घोषणाही करण्यात आल्या. सुपरहिट ‘झिम्मा’ फ्रँचायझीचा पुढचा भाग ‘झिम्मा ३’ आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कथेला पुढे नेत असलेला ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम २’ या चित्रपटांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

‘क्रांतिज्योती विद्यालय -मराठी माध्यम’ला मिळालेल्या प्रचंड प्रेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, ‘’हा चित्रपट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. २५ करोडचा टप्पा गाठणं ही संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे मनापासून आभार. तसेच रसिक प्रेक्षकांचे ऋण शब्दांत मांडता येणार नाही. याच प्रेमामुळे आम्हाला अधिक प्रामाणिक, आशयघन चित्रपट घेऊन येण्याची ऊर्जा मिळते.”

या यशस्वी प्रवासात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. शिक्षक-विद्यार्थी नात्याची भावनिक मांडणी, वास्तवाशी जोडलेला आशय आणि मराठी शाळेच्या आठवणी जागवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट केवळ यशस्वी ठरला नाही, तर प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव ठरला.

२५ कोटींचा टप्पा, सत्कार समारंभाचा जल्लोष आणि आगामी दोन चित्रपटांच्या घोषणांमुळे ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’चा प्रवास आता नव्या उंचीवर पोहोचताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बळावर ही टीम पुन्हा एकदा दमदार आणि आशयपूर्ण कथा घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे.

दरम्यान, प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळणाऱ्या या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ यांचा सहभाग आहे.

TRP मध्ये कमळी, स्वानंदी अन् तारिणीचं वर्चस्व! स्टार प्रवाहच्या टॉप मालिकांना धोबीपछाड; कोण कुठल्या स्थानावर?
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.