U19 World Cup: बॅटने इतिहास रचणाऱ्या वैभव सूर्यवंशीने मालिकावीर पुरस्कारानंतर शब्दांनी मनंही जिंकली, जाणून घ्या काय म्हणाला?
esakal February 07, 2026 01:45 PM

Vaibhav Suryavanshi wins hearts: भारतीय युवा संघाला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ जिंकून देण्यात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) मोलाचा वाटा उचलला. वयाच्या अवघ्या १४ वर्षीत तो क्रिकेट विश्वात त्याची ओळख बनवत आहे.

शुक्रवारी हरारेत झालेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप (U19 World Cup) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याने विश्वविक्रमी खेळी केली. त्यामुळे भारताने १९ वर्षांखालील इंग्लंड संघाला १०० धावांनी पराभूत करण्यात यश मिळवले.

U19 World Cup: 'सूर्याला तुम्ही थांबवू शकत नाही...' वैभव सूर्यवंशीच्या वादळी १७५ धावानंतर सेहवागची पोस्ट चर्चेत

अंतिम सामन्यात वैभवने ८० चेंडूतच १७५ धावांची खेळी केली. त्याने १५ चौकार आणि १५ षटकार मारले. तो १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.

यापूर्वी अंतिम सामन्यात कोणालाही दीडशे धावाही करता आलेल्या नाहीत. त्याने कर्णधार आयुष म्हात्रेसोबतही (५३) १४२ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने ५० षटकात ९ बाद ४११ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने ४१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वबाद ३११ धावा केल्या.

वैभवने या वर्ल्ड कपमध्ये जवळपास सर्व सामन्यात सलामीला आक्रमक खेळत भारताला चांगली सुरुवात दिली होती. त्याने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत ७ सामन्यांत ६२.७१ च्या सरासरीने ४३९ धावाही केल्या, यात एक शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तो या स्पर्धेत इंग्लंडच्या बेन मेयरनंतर (४४४) सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.

वैभवला त्याच्या या कामगिरीसाठी अंतिम सामन्यातील सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारही मिळाला. पण त्याने हे पुरस्कार भारताच्या सपोर्ट स्टाफला समर्पित केला. त्याच्या या निर्णयाने अनेकांची मनं जिंकली आहेत.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर वैभव सूर्यवंशी म्हणाला, 'प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्या आत्ता काय भावना आहेत, ते मी व्यक्त करू शकत नाही. आम्ही ७-८ महिन्यात केलेली तयारी, सपोर्ट स्टाफचे प्रयत्न, या स्पर्धेपूर्वी आशिया कप आणि इतर मालिकांमधील सर्व सामन्यांमधील मेहनतीमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मी खूप आनंदी आहे आणि मला हा पुरस्कार संपूर्ण सपोर्ट स्टाफला समर्पित करायचा आहे, ज्यांनी आम्हाला मदत केली आणि आमच्यासोबत गेली ९ महिने उभे राहिले.'

अंतिम सामन्यातील मानसिकता आणि तयारीबद्दल बोलताना वैभव म्हणाला, 'प्रमुख लक्ष्य होते की फार दबाव घ्यायचा नाही. आम्ही सुरुवातीपासून जे करत होतो, ज्या मार्गाने आलो होतो, त्यावरच विश्वास ठेवण्यावर आणि स्वत:वर विश्वास ठेवण्यावर आमचे लक्ष केंद्रित होते. आम्हाला आमच्या ताकदीवरच विश्वास ठेवायचा होता.'

'स्पर्धेसाठी तयारी आशिया कप आणि त्यापूर्वीच सुरू झाली होती. गेल्या ८-९ महिन्यात सपोर्ट स्टाफ आणि संघ एकत्र काम करत आहेत. त्या तयारीमुळे आम्ही आज इथे आहोत. हा आनंद व्यक्त करू शकत नाही, फक्त खेळाडूंना माहित आहे की गेली ९ वर्षे आम्ही एकत्र कसे काम केले आहे.'

वैभव पुढे म्हणाला, 'माझा माझ्या कौशल्यावर विश्वास आहे. मला माहित होते की मी मोठ्या सामन्यात योगदान देईल आणि आज तेच झाले.'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.