Malegaon Mayor Election 2026: मालेगाव महापालिकेच्या महापौरपदावर (Malegaon Municipal Corporation Mayor Election 2026) इस्लाम पार्टीच्या (Islam Party) शेख नसरीन बानो खालिद (Shaikh Nasreen Bano Khalid) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महापौरपदासाठी झालेल्या थेट लढतीत शेख नसरीन बानो यांना एकूण 43 मते मिळाली, तर शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवार लता सखाराम घोडके यांना 18 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शेख नसरीन बानो यांनी 25 मतांच्या फरकाने विजय संपादन केला.
आज मालेगाव महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेला जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. यावेळी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव हेही उपस्थित होते. सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाले, तसेच दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महापौरपदासाठी एकूण पाच नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. तपासणीनंतर इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद, शेख ताहेरा शेख रशीद आणि शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. माघारीसाठी देण्यात आलेल्या 15 मिनिटांच्या मुदतीत इस्लाम पार्टीच्या शेख ताहेरा शेख रशीद यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने शेख नसरीन बानो आणि लता घोडके यांच्यात सरळ लढत झाली.
या निवडणुकीसाठी महापालिका सभागृहात इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5, काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 18, भाजपचे 2 आणि एमआयएमचे 21 नगरसेवक उपस्थित होते. भाजप आणि एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने सत्तासंघर्षाचा फायदा इस्लाम पार्टीला झाला.
मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांना समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यासह 43 मते मिळाली. शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांना केवळ 18 मते मिळाल्याने त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला.
दरम्यान, निवडणुकीपूर्वी इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे नगरसेवक लक्झरी बसमधून एकत्रितपणे महापालिकेत दाखल झाले होते. महिला सदस्य काळ्या बुरख्यावर हिरवे फेटे, तर पुरुष सदस्य डोक्यावर हिरवे फेटे आणि अंगावर इस्लाम पार्टीचा गमछा परिधान करून स्वॅगमध्ये सभागृहात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. शिवसेनेचे नगरसेवकही भगव्या साड्या, भगवे फेटे आणि पांढऱ्या पोशाखात सभागृहात दाखल झाले होते. संभाव्य तणाव लक्षात घेता महापालिका प्रवेशद्वारासह संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि प्रत्येक सदस्याची तपासणी करण्यात आली होती.
आणखी वाचा