'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
नाजिम मुल्ला, एबीपी माझा February 07, 2026 03:43 PM

Sunil Shelke on NCP Merger: दिवंगत अजितदादांचं पवार कुटुंबात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली असेल, हे आम्ही नाकारत नाही. सुनेत्रा वहिनींनी विलीनीकरणाचा निर्णय घेतला तर माझा पाठिंबा असेल, असं मोठं विधान अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे. शरद पवारांचे आमदार रोहित पवारांनी येत्या 12 तारखेला पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे. सुनील शेळके अजितदादांची पवार कुटुंब आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांशी विलीनीकरणाची चर्चा झाली असेल, असे म्हणाले. 

तर विलीनीकरणाला माझा पाठिंबा असेल

आमदार सुनील शेळके म्हणाले की, सुनेत्रा वहिनी जे ठरवतील त्या पद्धतीनं होईल. त्यांनी म्हटलं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला माझा पाठिंबा असेल, असं शेळकेंनी जाहीरपणे म्हटलं. शरद पवार राष्ट्रवादीचा प्रस्ताव काय आहे हे आधी पहावं लागेल आणि त्यानंतर भाजपसह शिंदे शिवसेनेची संमती लागेल, असंही ते म्हणाले. 

अजित पवारांच्या जाण्याने सहानुभूतीची लाट 

दरम्यान, शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यात ल्हासूर्णेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना चांगलं यश मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. मात्र, सत्तारूढ पक्षाने मतदानाची स्ट्रॅटेर्जी बदलली आहे, पण लोकशाही टिकवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत त्याचा निश्चित फायदा होईल. सत्तेचा दबाव, विकास कामे केली जाणार नाही असं सुद्धा बोललं जातं, त्यामुळे लोक खूप दबावाखाली असतात. मात्र, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. स्वर्गीय अजित पवारांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला. त्याचा जाण्याने लोकांमध्ये सहानुभूती आहे त्यामुळे त्याचा फायदा निश्चित होईल, असे शशिकांत शिंदे म्हणाले. 

ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात?  

दरम्यान, दादांच्या अचानक जाण्याने मीटिंग कोणी बोलवायची? जर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत, तर त्यांनी जबाबदारीने पाऊल उचलले तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? असा सवाल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे त्यात इतरांनी लुडबुड करण्याची गरज नाही. आम्ही दुःखात असताना ही मंडळी विनाकारण टीका का करत आहेत? ज्या नेत्याने मला 30-40 वर्षे सांभाळले, त्यांच्या निधनानंतर मी जे सत्य घडले तेच बोललो आहे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. अपघातानंतर त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती की लवकरात लवकर सुनेत्रा वहिनींचा शपथविधी व्हावा. पवार घराणे हे पुरोगामी असल्याने तिसऱ्या दिवसाचे विधी आटोपल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.