'आम्ही एका हॉटेलमध्ये सेक्स केला, पण नंतर कळलं ते हजारो लोकांनी बघितलं'; छुप्या कॅमेऱ्यांचं भीतीदायक नेटवर्क
BBC Marathi February 07, 2026 01:45 PM
BBC

(इशारा: या लेखात काही ठिकाणी आक्षेपार्ह भाषा आहे.)

ती 2023 मधील एक रात्र होती. एरिक सोशल मीडियावरील एक चॅनल स्क्रोल करत होता. हे चॅनल तो पॉर्न व्हीडिओ पाहण्यासाठी नेहमीच पाहायचा. एक व्हीडिओ पाहायला लागल्यावर पहिल्या काही सेकंदांमध्ये तो थिजून गेला.

व्हीडिओ पाहताना त्यांच्या लक्षात आलं की, त्यामध्ये तो जे जोडपं पाहत होता - ते जोडपं खोलीत प्रवेश करत होतं, त्यांच्या बॅगा खाली ठेवत होतं आणि नंतर सेक्स करत होतं. ते जोडपं म्हणजे तो स्वत: आणि त्याची गर्लफ्रेंडच होती.

त्याच्या 3 आठवडे आधी, एरिक आणि त्यांच्या गर्लफ्रेंडनं, चीनच्या दक्षिण भागातील शेन्झेन येथील एका हॉटेलमध्ये रात्र घालवली होती. मात्र त्यावेळेस तिथे ते एकटे नाहीत याची त्यांना कल्पनादेखील नव्हती.

त्यांच्या सर्वात खासगी क्षणांचं चित्रण त्या हॉटेलच्या खोलीत असणाऱ्या एका छुप्या कॅमेरानं करण्यात आलं होतं. एरिक स्वत: ज्या चॅनलवर पॉर्नोग्राफी पाहायचा, त्या चॅनलवर लॉग इन करणाऱ्या हजारो अनोळखी लोकांना ते फुटेज उपलब्ध करून देण्यात आलं होतं.

चीनमधील स्पाय-कॅम पॉर्न उद्योग

एरिक (हे त्यांच खरं नाव नाही) हा आता चीनमधील छुप्या कॅमेरानं चित्रित करण्यात आलेल्या सेक्स व्हीडिओ (स्पाय-कॅम पॉर्न) उद्योगाचा फक्त ग्राहक राहिला नव्हता, तर तो त्याचा पीडित ठरला होता.

हे तथाकथित स्पाय-कॅम पॉर्न व्हीडिओ चीनमध्ये किमान एक दशकापासून अस्तित्वात आहेत. त्यांची निर्मिती आणि वितरण चीनमध्ये बेकायदेशीर असलं तरीदेखील ते अस्तित्वात आहेत.

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये, हा मुद्दा सोशल मीडियावर नियमितपणे चर्चेचा विषय बनला आहे. लोक - विशेषकरून महिला - एकमेकांना, पेन्सिलच्या खोडरबराएवढ्या छोट्या कॅमेऱ्यांना कसं ओळखायचं, याबद्दल टिप्स देत आहेत.

काही जणांनी तर हे चित्रीकरण टाळण्यासाठी नाईलाजानं, हॉटेलच्या खोल्यांमध्ये तंबूंचा वापर करण्याचा मार्ग अवलंबला आहे.

BBC छुप्या कॅमेऱ्यांद्वारे केल्या जाणाऱ्या लाईव्ह प्रक्षेपणामध्ये हॉटेलच्या खोलीतील बेड स्पष्टपणे दिसत आहेत

या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी एप्रिल 2025 मध्ये काही नवीन सरकारी नियम आणले गेले. त्यानुसार हॉटेल मालकांना त्यांच्या हॉटेलमध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आले आहेत की नाही यासाठी नियमितपणे तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलं.

मात्र हॉटेलच्या खोलीतील प्रायव्हसीमध्ये गुप्तपणे चित्रीकरण केलं जाण्याचा धोका अजूनही गेलेला नाही. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला अनेक वेबसाईटवर हॉटेलच्या खोल्यांमध्ये स्पाय-कॅमेऱ्यानं चित्रित करण्यात आलेले आणि पॉर्न म्हणून विकण्यात आलेले, अलीकडच्या काळातील हजारो व्हीडिओ आढळले आहेत.

पॉर्न व्हीडिओच्या प्रचारासाठी टेलीग्रामचा वापर

यातील बऱ्याचशा कॉन्टेंटची जाहिरात, टेलीग्राम या मेसिजिंग आणि सोशल मीडिया ॲपवर केली जाते. मला, 18 महिन्यांच्या कालावधीत, टेलीग्रामवर प्रचार करण्यात आलेल्या 6 वेगवेगळ्या वेबसाईट आणि ॲपची माहिती सापडली.

त्या सर्वांनी मिळून, हॉटेलच्या खोल्यांमधील 180 हून अधिक छुप्या कॅमेऱ्यांचा वापर करून हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या हालचालींचं फक्त चित्रीकरणच नव्हे, तर थेट प्रक्षेपण (लाईव्हस्ट्रीमिंग) करत असल्याचा दावा केला होता.

मी यापैकी एका वेबसाईटवर 7 महिने नियमितपणे लक्ष ठेवलं. त्यातून मला 54 वेगवेगळ्या कॅमेऱ्यांद्वारे चित्रित करण्यात आलेलं फुटेज सापडलं. त्यापैकी जवळपास निम्मे कॅमेरे, कोणत्याही विशिष्ट क्षणी कार्यरत होते.

बीबीसीच्या अंदाजानुसार, त्याचाच अर्थ हॉटेलच्या खोल्या ग्राहकांना दिल्या जाण्याचं सामान्य प्रमाण (ऑक्युपन्सी रेट) लक्षात घेता त्या कालावधीत हॉटेलमध्ये येणाऱ्या हजारो ग्राहकांचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. हॉटेलमध्ये येणाऱ्या बहुतांश ग्राहकांना छुप्या कॅमेऱ्यातून त्यांचं चित्रीकरण करण्यात आलं आहे, हे कदाचित माहितच नव्हतं.

हादरलेले एरिक आणि एमिली

एरिक हाँगकाँगचा आहे. त्यानं किशोरवयात असताना गुप्तपणे चित्रीत करण्यात आलेले असे सेक्स व्हीडिओ पाहण्यास सुरुवात केली. त्या फुटेजमधील 'नैसर्गिक'पणा त्याला आकर्षित करत होता.

आता वयाच्या तिशीत असलेला एरिक म्हणतो, "अशाप्रकारच्या व्हीडिओमध्ये लोकांना त्यांचं चित्रीकरण होत असल्याची माहिती नसते, ही गोष्ट मला त्याकडे आकर्षित करत होती. मला वाटतं की, पारंपारिक पॉर्न व्हीडिओ खूपच बनावट, खूपच खोटे वाटतात."

मात्र जेव्हा एरिकला स्वत:चा 'एमिली' या त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरचा व्हीडिओ सापडला, तेव्हा त्याला अशा व्हीडिओंमध्ये दिसल्यावर काय वाटतं याचा अनुभव आला. त्यामुळे आता याप्रकारच्या कॉन्टेंटमधून आनंद मिळत नाही.

BBC एरिक आणि एमिली, कोणीतरी त्यांना ओळखेल या भीतीनं टोपी घातल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत

एरिकनं एमिलीला सांगितलं की, त्यांच्या हॉटेलमधील वास्तव्यांचं चित्रीकरण केलं गेलं आहे आणि ते एडिट करून त्याची एक तासाची क्लिप टेलीग्रामवर अपलोड करण्यात आली आहे. त्यावेळेस एमिलीला एरिक चेष्टा करतो आहे, असं वाटलं. मग तिनं स्वत: ते फुटेज पाहिलं आणि तिला अतिशय लज्जित झाल्यासारखं वाटलं.

हा व्हीडिओ सहकारी आणि कुटुंबियांनी पाहिला असेल, या भीतीनं एमिली खूप घाबरली होती. त्यानंतर एमिली आणि एरिक अनेक आठवडे एकमेकांशी बोलले नाहीत.

बेसावध असलेल्या, धोक्याची जाणीव नसलेल्या जोडप्यांच्या खासगी लैंगिक कृतींचा वापर, असे क्षण चोरून पाहण्यात आनंद घेणाऱ्या आणि त्यासाठी पैसे देणाऱ्या ग्राहकांसाठी, काम करणारा हा उद्योग कसा चालतो, त्यामागे कोण आहे?

स्पाय-कॅम पॉर्न उद्योग कसा चालतो, त्यामागे कोण?

माझ्यासमोर आलेल्या सर्वात प्रमुख स्पाय-कॅम पॉर्न व्यापाऱ्यांपैकी एक होता, 'एकेए' (AKA) नावानं ओळखला जाणारा एजंट.

मी त्याला ग्राहक असल्याचं भासवलं. त्याच्याकडून प्रचारित करण्यात आलेल्या एका लाईव्ह प्रसारण करणाऱ्या वेबसाईटवर प्रवेश मिळवण्यासाठी मी त्याला पैसे दिले. या वेबसाईटसाठी 65 डॉलर (अंदाजे 5,891 रुपये) मासिक शुल्क होतं.

या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर, 5 वेगवेगळ्या चित्रीकरण फीडमधून निवड करण्याचा पर्याय माझ्यासमोर होता. त्यातील प्रत्येकावर अनेक हॉटेलमधील खोल्या दाखवल्या जात होत्या.

हॉटेलच्या त्या खोलीत येणाऱ्या ग्राहकानं आत येताना की-कार्ड म्हणजे चावीसारखं वापरलं जाणारं कार्ड टाकताच, खोलीतील वीज सुरू होताच, त्या खोलीतील दृश्य दिसू लागायचं. त्या लाईव्ह प्रसारणाला सुरुवातीपासून रिवाइंड करता येत होतं आणि संग्रहित व्हीडिओ डाउनलोड करणंदेखील शक्य होतं.

चीनमध्ये टेलीग्रामवर बंदी आहे. मात्र बेकायदेशीर कामांसाठी त्याचा सर्रास वापर केला जातो. एकेए या एजंटनं टेलीग्रामवर या लाईव्ह प्रक्षेपणांची जाहिरात केली होती. आमच्या तपासादरम्यान एका टेलीग्राम चॅनलवर तब्बल 10 हजार सदस्य होते.

त्यानं एडिट केलेल्या लाईव्हस्ट्रीम व्हीडिओंची लायब्ररी किंवा संग्रहदेखील टेलीग्रामवर निश्चित शुल्कावर उपलब्ध आहे. मला त्या संग्रहात, 2017 पासूनचे 6 हजारहून अधिक व्हीडिओ दिसले.

एकेएचे सबस्क्रायबर टेलीग्रामच्या चॅनल फंक्शनमध्ये हॉटेलमध्ये आलेल्या या बेसावध, कोणतीही कल्पना नसलेल्या ग्राहकांना पाहताना, त्यांच्यावर कॉमेंट करतात. ते या लोकांच्या दिसण्यावर टिप्पण्या करतात, त्यांच्या संभाषणांवर गप्पा मारतात. तसंच त्यांच्या लैंगिक क्रियेचं मूल्यांकन करतात.

ज्या वेळेस ही जोडपी सेक्स करू लागतात, तेव्हा हे सबस्क्राईबर आनंद व्यक्त करतात. जर या जोडप्यांनी लाईट बंद करून स्वत:ला अंधारात दडवलं, तर ते तक्रार करतात. महिलांचा उल्लेख नियमितपणे 'बदफैली', 'वेश्या' आणि 'कुत्री' या शब्दांनी केला जातो.

हॉटेलमधील स्पाय कॅमेरा शोधण्यात बीबीसीला यश

मध्य चीनमधील झेंगझोऊमधील एका हॉटेलच्या खोलीतील एका स्पाय-कॅमेऱ्याचा शोध लावण्यात आम्ही यशस्वी झालो. सबस्क्रायबर, सोशल मीडिया युजर्स आणि आमच्या स्वत:च्या संशोधनातून मिळालेले अनेक धागेदोरे जोडून तो कॅमेरा शोधण्यात आम्हाला यश आलं होतं.

घटनास्थळी असलेल्या संशोधकांना त्या खोलीत जाता आलं आणि त्यांना तो छुपा कॅमेरा सापडला. त्या कॅमेऱ्याचे लेन्स बेडच्या दिशेनं लावण्यात आलेले होते. भिंतीवरील एका व्हेंटिलेशन युनिटमध्ये तो लपवण्यात आलेला होता आणि तो इमारतीतील वीज पुरवठ्याशी जोडलेला होता.

छुपा कॅमेरा शोधण्यासाठीचा एक डिटेक्टर, 'अत्यावश्यक' वस्तू म्हणून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन विकला जातो. मात्र या डिटेक्टरनं त्यांच्यावर पाळत ठेवली आहे किंवा छुपं चित्रीकरण केलं जात असल्याची कोणतीही सूचना दिली नाही.

त्या टीमनं तो गुप्त कॅमेरा बंद केला आणि ही बातमी टेलीग्रामवर वेगानं पसरली.

"झोंगहुआ (कॅमेऱ्याचं नाव) बंद करण्यात आला!" असं एका सबस्क्रायबरनं एकेए व्यवस्थापन करत असलेल्या एका मुख्य चॅनलवर लिहिलं.

"ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे; त्या खोलीतील आवाजाची गुणवत्ता सर्वोत्तम होती!" असं उत्तर एकेएनं त्या चॅटमध्ये दिलं.

मात्र, एकेएनं दुसऱ्या हॉटेलमधील एक पर्यायी कॅमेरा सक्रिय केल्याचं पोस्ट केल्यानंतर, या तक्रारींचं रुपांतर जल्लोषात झालं.

"(आमच्या लाईव्ह प्रसारणासाठीच्या प्लॅटफॉर्मचा)... हाच वेग आहे. प्रभाव पाडणारा आहे, नाही का?" असं एकेएनं त्याच्या सबस्क्रायबर्सना सांगितलं.

पॉर्न व्यवसायाचा विस्तार आणि कमाई

आमच्या 18 महिन्यांच्या तपासादरम्यान, आम्ही एकेएसारखे जवळपास डझनभर लोक शोधले.

त्यांचं सबस्क्रायबरबरोबर जे संभाषण होत होतं, त्यातून हे स्पष्ट झालं की या उद्योगातील वरच्या थरातील लोकांसाठी ते काम करत होते. हे एजंट त्यांना 'कॅमेरा मालक' (कॅमेरा ओनर्स) असं म्हणत असत.

एजंट्सच्या कॉमेंटवरून असं दिसत होतं की हे लोक, गुप्त कॅमेरे बसवण्याचं आणि लाईव्हस्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचं व्यवस्थापन करण्याचं काम करत होते.

एकेए या एजंटबरोबर झालेल्या आमच्या थेट संदेशांदरम्यान, त्यानं चुकून एका व्यक्तीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला. या व्यक्तीला एकेए 'कॅमेरा मालक' म्हणत होता. त्याच्या प्रोफाईलवर 'ब्रदर चुन' असं नाव होतं.

एकेएनं लगेचच तो मेसेज डीलीट केला. त्याबाबत चर्चा करण्यास त्यानं नकार दिला. मात्र 'ब्रदर चुन'शी थेट संपर्क साधण्यास आम्हाला यश आलं. त्यानं एकेएला लाईव्हस्ट्रीमिंग वेबसाईटचा पुरवठा केला होता, याचे आमच्याकडे पुरावे होते.

असं असूनदेखील ब्रदर चुन यानं दावा केला की, तो फक्त विक्री करणारा एजंट आहे. मात्र, त्यानं हे कबूल केलं की ही पुरवठा साखळी, त्याच्यासारख्या लोकांच्या पलीकडेही पसरलेली आहे.

या व्यवसायातून मोठा पैसा कमावतो येतो, हे स्पष्ट आहे. चॅनलची मेंबरशिप आणि सबस्क्रिप्शनचं शुल्क याच्या आधारे, बीबीसीच्या अंदाजानुसार, फक्त एकेएनंच गेल्या एप्रिलपासून किमान 22 हजार डॉलर्स (अंदाजे 19 लाख 91 हजार रुपये) कमावले होते.

चीनच्या सांख्यिकी ब्युरोनुसार, गेल्या वर्षी चीनमधील सरासरी वार्षिक उत्पन्न 6 हजार 200 डॉलर्स (अंदाजे 5 लाख 61 हजार रुपये) होतं.

चीनमध्ये स्पाय कॅमेरे म्हणजे छुपे कॅमेरे विकण्याबाबत आणि त्यांचा वापर करण्यासाबाबत कठोर नियम आहेत. मात्र, हुआकिआंगबेई इथं असणाऱ्या चीनमधील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये असे कॅमेरे विकत घेणं तुलनेनं सोपं असल्याचं आम्हाला आढळलं.

स्पाय कॅम वापरून पॉर्न व्हीडिओ बनवणाऱ्या किती लोकांना न्यायालयासमोर आणण्यात आलं आहे, याची अचूक आकडेवारी मिळणं कठीण आहे.

अलीकडच्या वर्षांमध्ये चीनमधील अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रकरणांचे खूप कमी तपशील शेअर केले आहेत. मात्र आम्हाला सापडलेली प्रकरणं चीनच्या सर्व भागातील होती. उत्तरेच्या जिलिन प्रांतापासून ते अगदी दक्षिणेला असणाऱ्या ग्वांगडोंगपर्यंत ही प्रकरणं आढळून आली.

टेलीग्रामकडून प्रतिसाद नाही

ब्ल्यू ली, हाँगकाँगमधील 'रेनलिली' नावाच्या स्वयंसेवी संस्थेत काम करतात. ही संस्था पीडितांना, त्यांचं गुप्तपणे चित्रित करण्यात आलेलं अश्लील फुटेज इंटरनेटवरून काढून टाकण्यास मदत करते.

ब्ल्यू ली यांचं म्हणणं आहे की, त्यांच्या संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या सेवेसाठीची मागणी वाढते आहे. मात्र हे काम अधिक कठीण होत चाललं आहे.

ब्ल्यू लिली म्हणतात, रेनलिलीकडून असे व्हीडिओ काढून टाकण्यासाठी करण्यात आलेल्या विनंत्यांना टेलीग्राम कधीही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे त्यांना ग्रुपच्या ॲडमिनिस्ट्रेटशी संपर्क करावा लागतो.

हेच लोक छुप्या कॅमेऱ्यांनी तयार केलेले पॉर्नोग्राफिक व्हीडिओ विकतात किंवा शेअर करतात. त्यामुळे त्यांना प्रतिसाद देण्यात फारसा रस नसतो.

"आम्हाला वाटतं की, या समस्या सोडवण्यामध्ये तंत्रज्ञान कंपन्यांची मोठी जबाबदारी आहे. कारण या कंपन्या म्हणजे तटस्थ प्लॅटफॉर्म नाहीत. त्यांच्या धोरणांद्वारे ठरतं की, कॉन्टेंट कशाप्रकारे पसरवला जाईल," असं ली म्हणतात.

बीबीसीनं स्वत: त्यांच्या रिपोर्ट फंक्शनद्वारे टेलीग्रामला सांगितलं होतं की, एकेए, ब्रदर चुन आणि ते व्यवस्थापन करत असलेले ग्रुप्स, त्यांच्या (टेलीग्राम) प्लटॅफॉर्मचा वापर करून गुप्त कॅमेऱ्यांद्वारे तयार केलेले पॉर्न व्हीडिओ शेअर करत आहेत. मात्र टेलीग्रामनं कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

बीबीसीच्या तपासामुळे एकेए आणि ब्रदर चुनचे अकाउंट डीलीट

बीबीसीच्या तपासातील संपूर्ण निष्कर्षांसह 10 दिवसांनी पुन्हा संपर्क साधल्यानंतर, टेलीग्रामनं आम्हाला सांगितलं, "एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय पॉर्नोग्राफिक कॉन्टेंट शेअर करणं, यावर टेलीग्रामच्या सेवाशर्तींनुसार स्पष्टपणे बंदी आहे" आणि "टेलीग्राम आधीच त्यावर देखरेख करतं. तसेच त्यावर नियंत्रण ठेवतं आणि दररोज लाखो हानिकारक कॉन्टेंट काढून टाकण्यासाठी अयोग्य कॉन्टेंटसाठीच्या तक्रारी स्वीकारतं."

आम्ही औपचारिकपणे आमचे निष्कर्ष, ब्रदर चुन आणि एकेएला सांगितले की, ते हॉटेलमध्ये येणाऱ्या बेसावध आणि कोणतीही माहिती नसलेल्या ग्राहकांचं शोषण करून पैसे कमावत आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

मात्र अनेक तासांनी, ते याप्रकारच्या कॉन्टेंटची जाहिरात करण्यासाठी वापरत असलेले टेलीग्राम अकाउंट्स डीलीट केल्याचं दिसून आलं. मात्र एकेएनं मला ज्या वेबसाईटचं सबस्क्रिप्शन विकलं होतं, ती अजूनही हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांचं लाईव्ह प्रक्षेपण करते आहे.

एरिक आणि एमिली हे अजूनही त्या अनुभवाच्या मानसिक धक्क्यातून सावरलेले नाहीत. कोणी त्यांना ओळखणार तर नाही ना, या भीतीनं ते सार्वजनिक ठिकाणी नेहमी टोपी घालवतात. तसंच हॉटेलमध्ये राहण्याचं टाळतात. एरिक आता पॉर्न व्हीडिओ पाहण्यासाठी टेलीग्रामवरील हे चॅनल पाहत नाही. मात्र तो व्हीडिओ पुन्हा समोर येईल या भीतीनं तो अजूनही अधूनमधून ते चॅनल तपासतो, असं एरिक सांगतो.

केट ब्राउन, ब्रिजेट विंग आणि मेंग्यू डोंग यांचं अतिरिक्त वार्तांकन.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • स्टायलिश पण जीवावर बेतणारे; 'हिडन डोअर हँडल्स'ला चीनची 'दारं बंद'
  • रहस्यमय मशरुम ! जे खाल्ल्यानंतर बुटकी माणसं दिसल्याचा होतो भास, नेमका प्रकार काय?
  • चीन : ऑफिसमध्ये जाण्यासाठी तरुण स्वतःच देत आहेत पैसे, वाढत्या बेरोजगारीमुळं सुरू झाला विचित्र ट्रेंड
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.