अमेरिकेने इराणला घेरलं! ट्रम्प यांची सर्वात मोठी कारवाई, खामेनींची चिंता वाढली
GH News February 07, 2026 06:12 PM

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाला अमेरिकेचा विरोध आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये ओमानमध्ये चर्चा पार पडली. यानंतर काही तासांनी अमेरिकेने इराणला दणका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणवर मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेने इराणी पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांशी संबंधित 15 संस्थांवर निर्बंध लादले. अमेरिकेने इराणवर जागतिक अस्थिरतेला चालना देणाऱ्या कारवायांसाठी या निधीचा वापर केल्याचा आरोप करत हे निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेची इराणवर मोठी कारवाई

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले की, ” अमेरिकन परराष्ट्र विभागाने इराणी पेट्रोलियम, पेट्रोलियम उत्पादने आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्या 15 संस्था, दोन व्यक्ती आणि 14 बेकायदेशीर जहाजांवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. इराण या संस्थांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर त्यांच्या घातक कारवायांसाठी करत आहे. त्यामुळे ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांची चिंता वाढली आहे.

इराणी सरकावर निशाणा

अमेरिकेने आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, ‘इराण सरकार देशवासियांच्या कल्याणासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करण्याऐवजी, जागतिक अस्थिरतेला चालना देणाऱ्या कारवायांना वित्तपुरवठा करत आहे. जो पर्यंत इराण अशा कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत अमेरिका त्यांच्यावरील हे निर्बंध असेच ठेवणार आहे.’ दरम्यान, अमेरिकेच्या या कारवाईमुळे इराणच्या तेल उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.

तेल निर्यात कमी होणार

अमेरिकेच्या या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेल्या तेल निर्यातीला मोठा धक्का बसणार आहे. यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम इराणच्या सामान्य जनतेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता इराणी सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.