विधान भवनावर १० मार्चला गिरणी कामगारांचा मोर्चा
घरांच्या प्रश्नावर सरकारविरोधात संयुक्त लढा समिती आक्रमक
शिवडी, ता. ७ (बातमीदार):
घरांच्या प्रश्नावर सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने गिरणी कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर परळ येथे शुक्रवारी पार पडलेल्या १४ कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या बैठकीत येत्या १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता विधान भवनावर प्रचंड मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष व लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर होते. सरकारने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करून गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या विषयावर येत्या अधिवेशनात विधानसभेत आवाज उठवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
रखडलेल्या घरांच्या प्रश्नावर ९ जुलै रोजी विधान भवनावर संयुक्त लढा समितीच्या वतीने काढण्यात आलेले आंदोलन अभूतपूर्व ठरले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते; मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी ‘आठवण मोर्चा’ही काढण्यात आला. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेण्यात आल्या, तरीही ठोस कार्यवाही न झाल्याने बैठकीत संताप व्यक्त करण्यात आला.
राज्य सरकारने १५ मार्च २०२४ च्या अध्यादेशातील कामगारांना जाचक ठरणारे कलम १७ रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. हे कामगारांच्या संघटित लढ्याचे यश असल्याचेही नमूद करण्यात आले.
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्यासाठी स्वतंत्र अध्यादेश काढावा आणि पूर्वीचा नकारात्मक अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी समितीने केली आहे. बंद एनटीसी गिरण्यांच्या जागा, मिठागरांच्या जमिनी, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, बीडीडी चाळ पुनर्वसन तसेच ट्रान्झिट कॅम्पमधील घरे यामध्ये गिरणी कामगारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.
मुंबईतील गिरण्यांच्या जागेवर घरांच्या योजनेला शासकीय स्तरावर हिरवा कंदील मिळाल्याचे स्वागत करताना आमदार सचिन अहिर यांनी या योजनेत गिरणी कामगारांना प्राधान्याने घरे मिळाली पाहिजेत, असे स्पष्ट केले. येणारे आंदोलन निर्णायक व व्यापक करण्यासाठी तसेच अधिवेशनात दोन्ही सभागृहांत हा प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनाबाबत जिल्हा व तालुका स्तरावर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. बैठकीला रामिम संघाचे सरचिटणीस व लढ्याचे निमंत्रक गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सर्व श्रमिक संघटनेचे कॉ. विजय कुळकर्णी, गिरणी कामगार सेनेचे सत्यवान उभे, हेमनधागा जनकल्याण संघटनेचे हेमंत गोसावी, संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने आदी उपस्थित होते.